नवी दिल्ली : आपल्या घरात अजूनही मोठी माणसं जेवताना बोलू नये असे सल्ला देतात. पण बरेच लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. घरात असो किंवा बाहेर बरेच लोक गप्पा मारत जेवणे पसंत करतात. शांत बसून जेवणारा एकही जण दिसून येत नाही. पण खरा जेवणाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही शांत बसूनच जेवायला हवे. बोलता बोलता जेवल्याने ब-याच समस्या उद्भवू शकतात. जसे की पचनासंबंधीत समस्या ब-याच उद्भवतात.
जेवताना का बोलू नये, शांतपणे जेवल्याने काय फायदे होतात याबाबत आहारतज्ज्ञ श्रेया गोयल यांनी आपल्या इंस्टाग्राम हँण्डलवरून एक व्हीडीओ शेअर केला आहे. त्या सांगतात जेवताना जास्त बोलल्याने पोटात अन्नासोबत हवा पण जास्त भरली जाते. परिणामी ढेकर जास्त येतात. याव्यतिरिक्त अन्न घशात अडकण्याची शक्यता जास्त असते. आपल्या मेंदूला पोट भरले आहे असा संदेश मिळायला साधारण २० मिनिटे लागतात. शांतपणे चावून खाल्ल्यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त जेवत नाही. बोलण्याच्या नादात आपण किती आणि काय खातोय याकडे लक्ष राहत नाही. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
आहारतज्ज्ञांच्यामते जेवताना बोलल्यामुळे नर्व्हस सिस्टिम गोंधळात पडते कारण मेंदूला एकत्र २ गोष्टी कराव्या लागतात जेवण चावण्यासोबत, बोलण्याकडेही लक्ष द्यावे लागते. अशात तुम्ही अन्न व्यवस्थित चावले नाही तर पचनाशी संबंधित समस्याही उद्भवतात. शांतपणे जेवण्याचे बरेच फायदे आहेत. याव्यतिरिक्त लाळेचा फ्लो व्यवस्थित राहतो. अन्न पचायला मदत होते. शरीरातील पोषक तत्व व्यवस्थित शोषली जातात. मेटाबॉलिझ्म वेगानें होतो. तसेच जेवल्यानंतर पोटाला हलके वाटते आणि पचनक्रियाही चांगली राहते.
अन्न ग्रहण करताना का बोलू नये?
चाणक्यनीतीनुसार अन्न ग्रहण, अभ्यास आणि पूजा हे तिन्ही कार्य एकाग्रतेने करायला हवी. खाताना बोलल्यास शरीराची ऊर्जा बोलण्यात आणि पचन क्रियेत विभागली जाते, ज्यामुळे पचनशक्ती कमजोर होते. इतकेच नाही तर घास अडकण्याची शक्यता अधिक असते. आयुर्वेदानुसार एकाग्रतेने अन्न खाल्ल्यास जठराग्नी नीट काम करतो. जेवताना जर आपण भांडण केलं किंवा रागा रागात जेवलो तर त्यातील नकारात्मक ऊर्जा अन्नामध्ये उतरते. असे अन्न शारीरिक आणि मानसिक विष बनू शकतं. अन्न हे परब्रह्म आहे. आपण जर जेवताना बोललो ,तर त्या परब्रह्माच्या आपण अपमान करतो अशी मान्यता आहे. जसे अन्न, तसे मन शास्त्रांमधील ही शिकवण लक्षात घेऊनच अन्नाला प्रसादाप्रमाणे, मौन आणि कृतज्ञतेने ग्रहण करण्याचा सल्ला दिला जातो.
विज्ञान काय सांगते?
जेवत असतना जर आपण बोलत असून तर आपले जास्त लक्ष बोलण्याकडे असते आणि अन्नपदार्थ चावण्याकडे लक्ष कमी जाते. यामुळे भोजन गिळताना घशात अडकण्याचा धोका वाढतो. इतकेच नाही तर जीभ किंवा ओठ चावण्याची शक्यता अधिक असते. जेवताना अन्नातून लाळ तयार होते, जी सततच्या बडबडीमुळे बाहेर पडण्याची शक्यता असते. जेवण ही एक पवित्र, ऊर्जायुक्त आणि मनाशी जोडलेली क्रिया आहे. त्यामुळे अन्न शांतपणे, एकाग्रतेने आणि पूर्ण जागरूकतेने खाल्ले पाहिजे. अन्नाचा रंग, गंध, चव आणि पोत यावर लक्ष दिल्यास अन्न शरीरासोबतच मनालाही पोषण देते. एकूणच काय तर अन्न हेच ब्रम्हा आहे म्हणून त्याच्याशी मौनातून संवाद करा, शब्दातून नाही.

