नांदेड : प्रतिनिधी
जुन्या नांदेड शहरातील सक्षम ताटे ऑनर किलिंग प्रकरणातील २ पोलिस कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी ताटे कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असून यावेळी सक्षमची प्रेयसी आचल मामीलवाड हिचाही समावेश होता. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.
इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सक्षम ताटे या युवकाचा विजातीय प्रेम प्रकरणातून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणाची नोंद राज्यभर घेण्यात आली होती. त्यातील आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद केली होती. खुनाचे आरोपी सध्या तुरुंगात आहेत. याच प्रकरणात २ पोलिसांचा सुद्धा सहभाग असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ताटे कुटुंबीयांनी केली होती. ही घटना घडल्यानंतर मागील काही दिवसांपासून याबाबत पाठपुरावा केला जात आहे.
काही सामाजिक संघटनाकडून सुद्धा ही मागणी झाली. परंतू त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे ताटे कुटुंबियातील मयत सक्षमची आई, प्रेयसी आचल यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने त्यांना आत्मदहन करण्यापासून वजीराबाद पोलिसांनी मज्जाव केला व साहित्य जप्त केले. त्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान संबधित पोलिस कर्मचा-याच्या चौकशीचे आदेश पोलिस अधिक्षकांनी दिले होते. मात्र पुढे काय झाले याची माहिती मिळू शकली नाही.

