छत्रपती संभाजीनगर: नाशिक येथील बहुचर्चित TCS ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय देणे AIMIM चे माजी नगरसेवक मतीन पटेल यांना महागात पडले आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने आज पहाटे मोठी कारवाई करत मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालयावर बुलडोझर चालवला आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरणही तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक पोलिसांनी धर्मांतर आणि छळवणुकीच्या आरोपाखाली फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव भागातून अटक केली होती. तपासात असे समोर आले की, निदा खान ज्या घरात लपली होती, ते घर आणि मालमत्ता मतीन पटेल यांच्या मालकीची आहे. या घटनेनंतर प्रशासनाने मतीन पटेल यांच्या मालमत्तांची तपासणी केली असता, त्यांचे नारेगावमधील घर आणि १८०० चौरस फुटांच्या प्लॉटवरील कार्यालय अनधिकृत असल्याचे आढळले. महानगरपालिकेने त्यांना ७२ तासांची नोटीस बजावली होती. नोटिशीला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आणि न्यायालयानेही दिलासा नाकारल्याने आज पहाटे ६:१५ वाजता तीन जेसीबीच्या साहाय्याने हे अवैध बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले.
महानगरपालिका कारवाई करणार असल्याची माहिती मिळताच, AIMIM चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह पक्षाचे ३४ नगरसेवक आणि हजारो कार्यकर्ते मध्यरात्री साडेबारा वाजता नारेगावमध्ये जमा झाले होते. “ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात आहे,” असा आरोप करत कार्यकर्त्यांनी प्रशासनाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, पहाटेच्या सुमारास पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात करत ही कारवाई पूर्ण केली.
नाशिकमधील TCS च्या युनिटमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे जबरन धर्मांतर करणे, त्यांना हिजाब घालण्यासाठी प्रवृत्त करणे आणि हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोप निदा खानवर आहे. निदा खान सुमारे २५ दिवस फरार होती. तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी तिला मतीन पटेल यांच्याशी संबंधित घरातून ताब्यात घेतले. आरोपीला कायदेशीर कारवाईपासून वाचवण्यासाठी आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेल यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यमंत्री संजय शिरसाट यांनी या कारवाईचे समर्थन करताना म्हटले की, “ज्यांनी अशा प्रवृत्तींना आश्रय दिला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे होते. अनधिकृत बांधकामांवर कारवाई ही कायद्याच्या चौकटीत राहूनच केली जात आहे.” या बुलडोझर कारवाईमुळे गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांना प्रशासनाने एक प्रकारे कडक इशारा दिला असल्याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे.
















