29.9 C
Latur
Tuesday, February 10, 2026
Homeक्रीडाटीम इंडियाचा न्यूझीलंडला मालिकेत धोबीपछाड

टीम इंडियाचा न्यूझीलंडला मालिकेत धोबीपछाड

तिसरा सामना ८ विकेटने जिंकला

गुवाहाटी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी २० मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीचे तीन सामने जिंकून भारताने मालिका खिशात घातली आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी १५४ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने १० षटकांत फक्त २ गडी गमवून पूर्ण केले.

अभिषेक शर्माने नाबाद ६८ धावा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने नाबाद ५७ धावांची खेळी केली. तिस-या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला. कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसे पाहिले तर ही खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक होती. पण न्यूझीलंडच्या फलंदाजांना १५३ धावांवर रोखण्याचे काम भारतीय गोलंदाजांनी केली. यात जसप्रीत बुमराह आणि रवि बिश्नोईचा स्पेल खूप महत्त्वाचा ठरला. इतकेच काय तर हार्षित राणा आणि हार्दिक पांड्या यांनी पहिल्या षटकापासून न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दबाव टाकला. त्यामुळे न्यूझीलंडला भारतासमोर मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले.

न्यूझीलंडने २० षटकांत ९ गडी गमवून १५३ धावा केल्या आणि विजयासाठी १५४ धावांचे आव्हान दिले. हे आव्हान तसे पाहिले तर भारतासाठी सोपे होते. पण भारताची सुरूवात काही चांगली झाली नाही. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले १५४ धावांचे आव्हान गाठण्यासाठी संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात आली होती. पण पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसन बाद झाला. गोल्डन डकवर बाद झाल्याने आता पुढच्या सामन्यात त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळणं कठीण दिसत आहे. भारतीय संघ दबावात येईल असे वाटत होते. पण इशान किशनने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण केले आणि भारतावरील दडपण दूर केले. पहिल्या चेंडूवर विकेट पडल्यानंतही त्या षटकात १६ धावा काढल्या. यामुळे पुन्हा न्यूझीलंडवर दबाव वाढला. इशान किशन आणि अभिषेक शर्मा तुटून पडले. या जोडीने ५३ धावांची भागीदारी केली. इशान किशन एक फटका मारताना चुकला आणि विकेट देऊन बसला असे असूनही अभिषेक शर्मा काही थांबला नाही.

पावरप्लेमध्ये भारताने २ गडी गमवून ९४ धावा केल्या. यामुळे न्यूझीलंडचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर गेला. अभिषेक शर्माने १४ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याला सूर्यकुमार यादवची साथ लाभली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR