तिरुवनंतपुरम : वूमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात २०२५ या वर्षाचा अफलातून शेवट केला आहे. टीम इंडियाने तिरुवनंतपुरममधील पाचव्या आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेवर १५ धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर १७६ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र श्रीलंकेला २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून १६० धावाच करता आल्या.
यासह भारताने हा सामना जिंकला. भारताचा हा या मालिकेतील सलग पाचवा विजय ठरला. भारताने यासह श्रीलंकेला ५-० ने क्लिन स्वीप केलं. तर श्रीलंका भारत दौ-यासह २०२५ वर्षाचा शेवट विजयाने करण्यात अपयशी ठरली.
टीम इंडियाने १७६ धावांचा पाठलाग करणा-या श्रीलंकेला पहिलाच आणि मोठा झटका दिला. टीम इंडियाने श्रीलंकेची कॅप्टन चमारी अट्टापट्टू हीला दुस-याच ओव्हरमध्ये २ धावेवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर हसिनी परेरा आणि इमेशा दुलानी या दोघांनी दुस-या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
त्यामुळे श्रीलंकेला विजयाची आशा होती. मात्र इमेशा दुलानी अर्धशतकानंतर आऊट झाली. इमेशा आऊट होताच निर्णायक भागीदारी मोडीत निघाली. इमेशा आणि हसिनी या दोघींनी ५६ चेंडूत ७९ धावांची भागीदारी केली. इमेशाने ३९ बॉलमध्ये ५० रन्स केल्या. त्यामुळे श्रीलंकेचा स्कोअर २ आऊट ८६ असा झाला.

