कराची : भारतीय संघाला डेव्हिस कप टेनिस सामन्यासाठी पाकिस्तानला जाण्याची परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे. ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने (एआयटीए) शनिवारी ही माहिती दिली. एआयटीएने अलीकडेच क्रीडा मंत्रालयाकडे ३-४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमध्ये होणा-या वर्ल्ड ग्रुप वन प्लेऑफसाठी संघ पाठवता येईल का? याबाबत सल्ला मागितला होता.
एआयटीएचे सरचिटणीस अनिल धुपर म्हणाले, आम्हाला अद्याप लेखी मंजुरी मिळालेली नाही, मात्र लवकरच ती मिळेल. आम्हाला सांगण्यात आले आहे की ही द्विपक्षीय मालिका नसून ती आयटीआयद्वारे आयोजित केली जात असल्याने, सरकार अशा स्पर्धांमध्ये हस्तक्षेप करत नाही. त्याची एक प्रक्रिया आहे. क्रीडा मंत्रालयाने ही विनंती परराष्ट्र आणि गृह मंत्रालयांना पाठवली असून त्यांच्या अभिप्रायानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. आम्हाला लवकरच मंजुरी मिळेल अशी आशा आहे. आम्ही स्पर्धा आणि प्रवासाची तयारी करत आहोत.
दरम्यान, पाकिस्तान टेनिस फेडरेशनने (पीटीएफ) शनिवारी सांगितले की ते इस्लामाबाद येथे होणा-या डेव्हिस कप टायमध्ये एआयटीए खेळाडू आणि अधिकारी यांच्या सहभागाबाबत अंतिम पुष्टीची वाट पाहत आहेत. पीटीएफचे अध्यक्ष सलीम सैफुल्ला म्हणाले, ‘एआयटीएफने आम्हाला ११ अधिकारी आणि सात खेळाडूंची व्हिसासाठी यादी पाठवली आहे. आम्ही त्याच्या आगमनाच्या अंतिम पुष्टीची वाट पाहत आहोत. एआयटीएने म्हटले आहे की ते त्यांच्या सरकारकडून पाकिस्तानला जाण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतरच पुष्टी करतील.’