25.7 C
Latur
Thursday, December 2, 2021
Homeतंत्रज्ञानई- कच-याचेही होणार रिसायकलिंग

ई- कच-याचेही होणार रिसायकलिंग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कच-याची समस्या ही मानवी संस्कृतीच्या विकासाबरोबरच माणसाच्या मागे लागली आहे. ईलेक्ट्रॉनिक क्रांतीनंतर ई-कच-याचीही समस्या त्यात जमा झाली आहे. सामान्य कच-याप्रमाणे हा ई-कचरा विघटीत होत नसल्याने ही समस्या अत्यंत उग्र बनली आहे. अशातच आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे ही समस्या मिटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

आईआईटी दिल्लीच्या संशोधकांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाने ई -कच-याचे कुशल व्यवस्थापन शक्य आहे. तसेच त्याचा पुनर्वापर करुन उत्पादननिर्मितीसाठीही चालना देता येणार आहे. स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत व आत्मनिर्भर भारत या सर्व केंद्रसरकारच्या योजनांसाठी हे तंत्रज्ञान पुरक ठरेल असा दावाही या शास्त्रज्ञांनी केला. आयआयटी दिल्लीतील रसायनशास्त्र अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रोफेसर के.के.पंत यांनी या संशोधकांना मार्गदर्शन केले.
सर्वप्रथम ई-कच-यातून तरळ व वायू स्वरुपातील इंधन प्राप्त करण्याचे काम पायरॉलिसीस या क्रियेतून केले जाते. त्यानंतर दुसरी उन्नत रासायनिक क्रिया वापरुन ई-कच-यातून ९० ते ९५ टक्के धातू मिश्रण व काही प्रमाणात कार्बनयुक्त पदार्थांची पुनर्प्राप्ती करतात.कॉर्बनयुक्त पदार्थांना एयरोजेलमध्ये परावर्तित केले जाते.

त्याचा उपयोग गळालेल्या तेलाची सफाई, डाग काढण्यासाठी करता येतो. तसेच सुपरकपॅसिटरमध्येही वापर करता येतो. पुढील टप्प्यात कमी तापमानाच्या रोस्टिंग क्रियेचा वापर करुन वैयक्तिक गरजेच्या धातुंची (तांबे, झिंक,शिसे आदी) पुनर्प्राप्ती केली जाते. या प्रक्रियेतून ९३ टक्के तांबे, १०० टक्के निकेल,झिंक,शिसे मिळवता येते. सोने व चांदीचीही ५० टक्क्यांपर्यंत पुनर्प्राप्ती करता येते, असे पंत यांनी सांगितले. ई-कच-याच्या रिसायकलिंगसाठी वापरण्यात येणा-या सर्व रासायनिक क्रिया व प्रक्रिया या पुर्णपणे पर्यावरणपुरक आहेत. त्यातून हवेत किंवा इतर कोठेही कुठल्याही प्रकारच्या घातक तत्वांचे उस्तर्जन होत नाही.

तीन प्रक्रियांचा समावेश
ई-कच-याला शहरी खनिज असेही म्हटले जाते. त्यातून धातुच्या पदार्थांची प्राप्ती व उर्जा उत्पादनही करता येईल, असे पंत यांचे म्हणणे आहे. या कार्यप्रणालीत ३ मुख्य प्रक्रिया असतील. पहिल्या प्रक्रियेत ई-कच-याचे पायरोलिसिस केले जाते. ज्यात ताप-अपघटन क्रियेचा वापर करुन ई-कचरा गरम करुन वेगवेगळया पदार्थांमध्ये वेगळा केला जातो. उदा. कॅल्शियम कार्बोनेटला गरम केले तर ते कॅल्शियम ऑक्साइडमध्ये बदलते व त्यातून कार्बन डाइऑक्साइड वायू मिळतो. दुस-या प्रक्रियेत ई-कच-यातून धातंूना विभक्त केले जाते. तिस-या प्रक्रियेत या धातूतून महत्त्वाच्या धातुंची पुनर्प्राप्ती केली जाते.

…तर ई-कच-याचा डोंगर तयार होईल
ग्लोबल ई-वेस्ट मॉनिटर अहवालानूसार २०१९ मध्ये जागतिक पातळीवर ५३.७ दशलक्ष टन ई-कच-याची निर्मिती झाली. २०३० मध्ये हे प्रमाण ७४.७० दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ई-कचरा उत्पादनात भारतात जगात तिस-या क्रमांकावर असून वेळीच यावर मार्ग न काढल्यास ई-कच-याचा मोठा डोंगरच निर्माण होण्याची भीती प्राध्यापक पंत यांनी व्यक्त केली.

मोठ्या प्रमाणात रोजगाराची शक्यता
ई-कच-याच्या पुनर्वापराची ही पद्धत प्लास्टिकच्या कच-याच्या पुनर्वापरासाठीही प्रभावी आहे, असे पंत यांनी सांगितले. पर्यावरण पुरक असलेल्या या उद्योगातून पुनर्वापर क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती करण्याची क्षमता आहे. आयआयटी दिल्लीने या तंत्रज्ञानाचे पेटंट मिळविले आहे. जागतिक पातळीवर जेव्हा या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होईल. तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेलाही त्याचा मोठा फायदा होणार आहे,असे पंत यांनी सांगितले.

कांग्रेसकडून महिलांना दरमहा २ हजार रुपये मिळणार – प्रियांका गांधी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या