17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeतंत्रज्ञानव्हॉटसअ‍ॅपने बंद केली २० लाखांवर खाती!

व्हॉटसअ‍ॅपने बंद केली २० लाखांवर खाती!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मॅसेजिंग ऍप व्हॉट्सऍपने ऑगस्टमध्ये भारतातील २० लाखांहून अधिक वापरकर्त्यांची खाती बंद केली आहेत. भारताच्या आयटी नियमांचे आणि व्हॉट्सऍप सेवा अटींचे उल्लंघन करणा-या खात्यांवर ही कारवाई करण्यात आली. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या व्हॉट्सऍपच्या मासिक अनुपालन अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

मॅसेजिंग प्लॅटफॉर्मने नुकताच आपला अनुपालन रिपोर्ट जारी केला आहे. यासंदर्भात ४२० तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याआधारे २० लाख ७० हजार भारतीय अकाऊंटवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. भारतीय अकाऊंटची ओळख फोन नंबरच्या आधारे केली गेली. या अगोदर फेसबुकच्या मालकी कंपनीने केलेल्या कारवाईत ज्या व्हॉटसअ‍ॅप अकाऊंटच्या विरोधात कारवाई केली, त्यात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त स्वचलित आणि स्पॅम संदेश पाठविणा-या खात्यांची संख्या होती. व्हॉटसअ‍ॅपचा दुरुपयोग रोखण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपने जगभरातील ८० लाख उकाऊंटवर बंदी घातली.

व्हॉटसअ‍ॅपने भारतात १६ जून ते ३१ जुलैपर्यंत ३ लाख खाती बंद केली होती. ५९४ तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. जगभरात सरासरी ८ कोटी खात्यांवर व्हॉट्सऍपने बंदी घातली आहे. परवानगीशिवाय स्वयंचलित किंवा बल्क संदेश पाठवण्यासाठी २० लाख ७० हजार खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. अहवालानुसार ऑगस्ट महिन्यात व्हॉटसऍपला ४२० तक्रारी आल्या होत्या. यामध्ये अकाउंट सपोर्टच्या १०५ तक्रारी, बंदी अपीलच्या २२२, प्रॉडक्ट सपोर्टच्या ४२, सिक्युरिटीच्या १७ आणि इतर सपोर्टच्या ३४ तक्रारींचा समावेश आहे.

भारत सरकारने २६ मे रोजी नवीन आयटी नियम लागू केले होते. या नियमांनुसार ५० लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते असलेले कोणतेही डिजिटल प्लॅटफॉर्म प्रत्येक महिन्याला अनुपालन अहवाल प्रकाशित करणे आवश्यक आहे. या अहवालात प्राप्त झालेल्या तक्रारी आणि त्यांच्या आधारे केलेल्या कारवाईची माहिती द्यावी लागणार आहे. व्हॉट्सऍपने यावर जोर दिला आहे की तो कोणत्याही वापरकर्त्याचे संदेश वाचत नाही. हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये वापरकर्त्याची माहिती संरक्षित आहे. प्लॅटफॉर्म ऑपरेशनसाठी उपलब्ध नसलेल्या एनक्रिप्टेड माहितीवर अवलंबून आहे. यामध्ये यूजर रिपोर्ट, प्रोफाइल फोटो, ग्रुप फोटो आणि ग्रुप डिस्क्रिप्शन सामिल आहे.

गैरवापर टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
व्हॉट्सऍपच्या प्रवक्त्याने सांगितले की, यूजर सिक्युरिटी रिपोर्टमध्ये तक्रारी देण्यात आल्या आहेत. प्लॅटफॉर्मचा गैरवापर टाळण्यासाठी व्हॉट्सऍप आपली कारवाई सुरू ठेवेल. प्लॅटफॉर्मवर स्पॅम आणि नको असलेले संदेश रोखण्यावर आमचा भर आहे, असे सांगण्यात आले. व्हॉट्सऍपने आपल्या सपोर्ट पेजमध्ये म्हटले आहे की ते तक्रार चॅनेलद्वारे वापरकर्त्यांच्या तक्रारींची नोंदणी करते. मेसेजिंग ऍप प्लॅटफॉर्मवर हानिकारक वर्तन टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता साधने आणि संसाधने वापरते.

फेसबुकचीही कारवाई
ऑगस्ट महिन्यात फेसबुकनेही भारतातील ३.१७ कोटी सामग्रीवर कारवाई केली आहे. कंपनीने जारी केलेल्या अनुपालन अहवालात १० श्रेणींच्या अंतर्गत ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले. फेसबुकने फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने ९ श्रेणींच्या अंतर्गत या काळात २२ लाख सामग्रींवर कारवाई केली. तत्पूर्वी १६ जून आणि ३१ जुलैदरम्यान देशात ३.३३ कोटी सामुग्रींविरोधात कारवाई केली होती.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या