पाटना : राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला असून लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच तेज प्रताप यादव यांना कुटुंबातून देखील बेदखल करण्यात येत असल्याचे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.
लालू प्रसाद यांनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, या पोस्टमधून त्यांनी याबाबत माहिती दिली, इथून पुढे आता तेज प्रताप यांची पक्षात आणि कुटुंबासाठी कोणतीही भूमिका नसेल असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे. वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. मोठ्या मुलाचा सार्वजनिक व्यवहार आणि वर्तन तसेच कार्यपद्धती आपल्या कौटुंबीक मुल्ये आणि परंपरांनुसार नाही आहे. म्हणून मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याचा पार्टी आणि कुटुंब यामध्ये कोणतीही भूमिका नसणार आहे. मी त्याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करत आहे असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.
त्याच्या आयुष्यातील चांगल्या वाईट गोष्टी आणि गुण-दोष पाहण्यासाठी तो सक्षम आहे. ज्या लोकांना त्याच्यासोबत संबंध कायम ठेवायचे आहेत, त्यांनी त्यांच्या स्वत:च्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत. मी नेहमीच सार्वजनिक जीवनात योग्य अचारण असले पाहिजे, या भूमिकेचा समर्थक राहिलो आहे असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे. दरम्यान तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जाहीर कबुली दिली होती, त्यांनी अनुष्का यादव नावाच्या एका तरुणीसोबत आपला फोटो शेअर केला होता, मी अनुष्कासोबत गेल्या १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.