नाशिक : ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ देणारी ऐतिहासिक घटना शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर रोजी नाशिककरांनी अनुभवली. देशात बनवलेले पहिले तेजस एमके १ ए लढाऊ विमान नाशिकमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या ओझर युनिटमधून आकाशात झेपावले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत ही ऐतिहासिक कामगिरी पार पडली.
हे अत्याधुनिक लढाऊ विमान भारतीय वायुसेनेत अधिकृतपणे दाखल झाले असून त्यासोबतच एचएएलच्या नवीन उत्पादन लाईनचे उद्घाटनही यावेळी करण्यात आलं. बंगळुरूनंतरची ही दुसरी उत्पादन सुविधा असून, स्वदेशी संरक्षण क्षमतेच्या दृष्टीने ही एक महत्त्वपूर्ण घडी ठरली आहे. एचएएलच्या नाशिक युनिटमध्ये तयार करण्यात आलेल्या तेजस एमके १ ए विमानाने आज पहिली झेप घेतली. विमान लँड झाल्यानंतर धावपट्टीवर अग्निशमन दलाच्या पाण्याच्या फर्वायांनी त्याचे जलतुषारात स्वागत करण्यात आले. यानंतर चित्तथरारक एअर शो सादर करण्यात आला, ज्यामध्ये तेजस आणि सुखोई लढाऊ विमानांनी सहभाग घेतला.
तेजस विमानाची वैशिष्टये
पूर्ण भारतीय बनावटीचे तेजस विमान सर्वात हलके लढाऊ विमान आहे. ताशी २००० किलोमीटर वेग आणि हवेतच इंधन भरण्याची क्षमता आहे. ध्वनीच्या वेगाच्या १.६ पट म्हणजेच सुमारे २,००० किमी प्रतितास वेगाने उड्डाण करण्यास हे विमान सक्षम आहे. ५०,००० फूट उंचीपर्यंत सहज उड्डाणाची क्षमता आहे. सर्व दिशांनी लक्ष्य साधण्याची क्षमता असलेले हे लढाऊ विमान आहे. एईएसए रडारमुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य ओळखणे आणि ट्रॅक करणे शक्य होते. सीआयटी प्रणालीमुळे ‘मित्र की शत्रू’ अशी लक्ष्य ओळख त्वरित शक्य होते. एसडीआर रेडिओमुळे सुरक्षित व सॅटेलाइटद्वारे संवाद साधण्याची सुविधा आहे. डिजिटल मॅप जनरेटरमुळे परिसर आणि उंचीची अचूक माहिती मिळते. ईडब्ल्यू स्यूट प्रणाली शत्रूच्या रडारला जॅम करून फसवण्याची क्षमता देते. एसएमएफडी स्क्रीनवर मिशन डेटा, नकाशे आणि अलर्टची थेट माहिती मिळते. डेल्टा विंग डिझाइनमुळे उच्च वेग आणि चपळ उड्डाण क्षमता आहे. क्वाड्रप्लेक्स डिजिटल फ्लाइट कंट्रोलमुळे अचूक आणि स्थिर नियंत्रण मिळवते.
काय म्हणाले राजनाथ सिंह?
यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, लढाऊ विमानाची शानदार उड्डाणे झाली. गौरव, अभिमान वाटत होता. ज्यावेळी हा कार्यक्रम संपन्न होत होता, तेव्हा श्रीरामाचे भजन होत होते. श्रेया जोशी या गायिकेने गायले त्यांचे अभिनंदन. या निमित्ताने नाशिकला येण्याचा योग आला. नाशिकची भूमी ऐतिहासिक आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर ही भगवान शिवाची भूमी आहे. इथे आल्यावर दिव्य भूमीत आल्यासारखे वाटते. इथे आस्था, श्रद्धा आहे. त्याच वेळी एचएएल हे राष्ट्राच्या संरक्षणाचे प्रतीक आहे. इथे प्रात्यक्षिक बघितले तेव्हा माजी छाती गौरवाने फुलून गेली. हे आत्मनिर्भर भारताचे पाऊल आहे. आजवर इतर देशांवर आपला देश अवलंबून होता. आता भारतात ६५ टक्के विमान बनत आहोत. थोड्याच दिवसात आपण १०० टक्के आत्मनिर्भर होणार आहोत असे त्यांनी म्हटले.
















