नवी दिल्ली : मेघालयमध्ये भारत-बांगलादेश सीमेवर एका ५५ वर्षीय बांगलादेशी नागरिकाच्या घुसखोरीवरून सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि आणि बॉर्डर गार्ड बांग्लादेश (बीजीबी) आमनेसामने आल्याचे समोर आले आहे. याचा व्हीडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सती राजबंशी (वय ५५, रा. राजशाही, बांगलादेश) असे या व्यक्तीचे नाव असून त्याने मेघालयाच्या दक्षिण-पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील महेंद्रगंजजवळील नंदीरचार सीमेवरून भारतात बेकायदेशीर प्रवेश केला होता. घुसखोरीच्या संशयावरून बीएसएफने त्याला ताब्यात घेतले. बीएसएफने नियमानुसार त्याला पुन्हा बांगलादेशच्या हद्दीत पाठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बांगलादेशच्या सैनिकांनी तो भारतीय नागरिक असल्याचा दावा करत त्याला स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून दोन्ही देशांच्या जवानांमध्ये जोरदार वाद झाला. त्यामुळे तो व्यक्ती ‘नो-मॅन्स लँड’ अडकला आहे. व्हायरल व्हीडीओमध्ये बांगलादेशी सैनिक मुजोरी दाखवताना दिसत आहे.
वृद्धाचा पत्ता आणि राष्ट्रीयत्वावरून दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये तूतूमेमे होते. दोन्ही देशांचे सैन्य आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने स्थानिक कमांडर स्तरावर झालेली फ्लॅग मीटिंग देखील निष्फळ ठरली. अखेर काही तासांच्या तणावानंतर बांगलादेशी अधिका-यांनी त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याला आपल्या ताब्यात घेतले आणि हा वाद निवाळला.
















