जळगाव : जळगाव शहराजवळील गिरणा नदीवरील बांभोरी पुलावर रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कार आणि कंटेनरचा अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तिघेही धरणगाव तालुक्यातील झुरखेडे येथील रहिवासी असून, एकमेकांचे नातेवाईक होते. या अपघातानंतर झुरखेडे गावावर शोककळा पसरली.
भुसावळजवळील वनोली येथे सध्या देवीची यात्रा सुरू आहे. या यात्रेसाठी आलेल्या एका नातेवाईकाला सोडण्यासाठी पंकज चौधरी, हरीश चौधरी आणि रवींद्र चौधरी हे तिघे कारने गेले होते. तेथे नातेवाईकाला सोडल्यानंतर ते जळगावकडे आले आणि तेथून आपल्या ‘झुरखेडे’ या गावी परत जाण्यासाठी निघाले होते.
सर्वजण नातेवाईकांना सोडून कारने गावी परत येत होते. त्यावेळी बांभोरी पुलावरून त्यांच्या कारची आणि समोरून येणा-या कंटेनरची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, कारमधील तिन्ही तरुणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेमुळे झुरखेडे गावावर आणि परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
















