26.6 C
Latur
Friday, November 7, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबई, ठाणेसह ५ महापालिका एकत्र लढण्यावर ठाकरे व मनसेमध्ये एकमत

मुंबई, ठाणेसह ५ महापालिका एकत्र लढण्यावर ठाकरे व मनसेमध्ये एकमत

खासदार संजय राऊत यांचा दावा राज ठाकरेंच्या मातोश्री भेटीत झाली राजकीय चर्चा मनसे नेत्यांचे मात्र मौन

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक या महापालिकेची निवडणूक एकत्र लढण्याबाबत शिवसेना (ठाकरे) व मनसे या दोन पक्षांमध्ये एकमत झाले असल्याचे ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

याशिवाय काही भागात मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असून कुठे, कोणाची मदत घेता येईल, या सर्व गोष्टींचा विचार सुरू असल्याचेही राऊत म्हणाले. मनसेच्या नेत्यांनी मात्र याबद्दल आम्हाला कोणतीही कल्पना नसल्याचे स्पष्ट केले. रविवारी एका कार्यक्रमात उद्धव व राज ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर दुपारी राज ठाकरे मातोश्रीवर गेले. या भेटीबाबत विचारता राऊत यांनी, ती राजकीय भेटच होती व या भेटीत त्या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे स्पष्ट केले. मात्र, काय चर्चा झाली हे त्यांनी स्पष्ट केले नाही.

उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांचे व्यक्तीगत आणि राजकिय नाते अतिशय घट्ट झाले आहेत. कोणी कितीही देव पाण्यात बुडवून बसले असले तरी आता प्रकरण फार पुढे गेले आहे. आता माघारीचे दोर नाहीत. त्यामुळे कुणी कुठल्या मेळाव्यात काय वक्तव्य केले तरी त्यांच्या छाताडावर पाय ठेवून ठाकरे बंधू एकत्र राहायच्या मनस्थितीत आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात २७ महानगरपालिका आहेत. प्रत्येक जागेवर, पॅनेलवर चर्चा व्हायला हवी. प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती वेगळी आहे आणि या सगळ्यावर चर्चा होत आहे. शिवाय प्रत्येक महानगरपालिकेत दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते चर्चा करीत असून या चर्चाचा अंतिम टप्पा गाठलाय, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाविकास आघाडीचे दरवाजे खुले आहेत हे राज ठाकरेंना सांगण्याचा अधिकार माझा एकट्याचा नाही. महाविकास आघाडी एका पक्षाची बनलेली नाही. त्यामध्ये तीन पक्ष आहेत. मनसे हा स्वतंत्र बाण्याचा पक्ष आहे. पण याक्षणी शिवसेना आणि मनसे यांच्यात चर्चा सुरु आहे. शिवसेनेचे मविआशी उत्तम संबंध आहेत आणि आघाडीच्या नेत्यांचे राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईचा महापौर ठाकरे बंधूचाच असेल
मुंबईचा महापौर हा मराठी आणि मराठी बाण्याचा होईल, तो अस्सल भगव्या रक्ताचा असेल, म्हणजेच ठाकरे बंधूचाच महापौर होईल असे राऊत यांनी सांगितले. मराठी बाण्याचे म्हणजे भाजप किंवा मिंधे सांगतात तसे नाहीत. दिल्लीचे जोडे उचलणारा माणूस मुंबईचा महापौर होणार नाही. हुतात्मा चौकात जाऊन आमच्या १०५ हुतात्म्यांसमोर दंडवत घालेल आणि महाराष्ट्राची गर्जना करेल त्यांचाच महापौर होईल असेही राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR