मुंबई : प्रतिनिधी
मतदार याद्यांमधील घोळाबाबत विरोधकांनी पुराव्यानिशी आरोप केल्यानंतर भाजपने आता याला धार्मिक रंग देण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे बंधूंना यादीतील फक्त हिंदू दुबार मतदार दिसले. पण अनेक मतदारसंघात हजारो मुस्लिम दुबार मतदार असताना त्याबाबत मात्र त्यांनी सोईस्कर मौन बाळगले आहे. त्यांनाही हा व्होट जिहाद हवा आहे का ? असा सवाल भाजप नेते व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज केला.
भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यापासून ते रोहित पवार यांच्यासह प्रमुख विरोधी पक्षनेत्यांच्या मतदारसंघातील मुस्लिम दुबार मतदारांची यादीच वाचून दाखवली. विरोधकांवर आरोप करताना आशिष शेलार यांनी मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठा घोळ असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली.
मतदारयाद्यांमध्ये प्रचंड मोठा घोळ असून या याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी विरोधकांनी केली आहे. याच मागणीसाठी शनिवारी महाविकास आघाडी व मनसेने मुंबईत विराट मोर्चाही काढला होता. निवडणूक आयोगाने सदोष मतदारयाद्या दुरुस्त केल्या नाहीत तर न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष व सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मतदारयाद्यांमध्ये अनेक मुस्लिम दुबार मतदार असताना त्याबद्दल मौन बाळगून विरोधक दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला.
राज ठाकरे यांना दुबार मतदार असलेले हिंदू आणि मराठी माणसे दिसतात. मात्र अनेक मतदारसंघातील दुबार नावे असलेले मुस्लीम दिसत नाहीत. राज ठाकरे यांनाही व्होट जिहादचे दुखणे जडले आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. भाजपा कधीच मतदारांमध्ये भेद करत नाही मात्र मविआ आणि त्यांचा नवा भिडू राज ठाकरे हे जाती, धर्म, समाजांमध्ये भेदभाव करत असून त्यांना आम्ही उघडे पाडणार आहोत. विरोधी पक्ष नेत्यांच्या मतदारसंघातील दुबार मतदारांची नावे आणि संख्या समोर आणताना, मविआ आमदारांचा विजय या मुस्लीम दुबार मतदारांमुळेच झाला असे म्हणायचे का ? असा सवाल केला. दुबार मतदार दिसतील त्यांना बसवण्याची भाषा करताना पुन्हा मराठी माणसालाच बडवणार का? असा सवालही त्यांनी केला.
महाविकास आघाडीच्या सत्याच्या मोर्चामध्ये निव्वळ असत्यकथन करून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली. विधानसभा निवडणुकीत विरोधकांना ‘जोर का झटका’ लागल्याने दिल्लीतील पप्पू ते गल्लीतील पप्पू पर्यंत सर्वांनी मतचोरीच्या फेक नरेटिव्हची बांधणी करत रान उठवण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर विरोधक खोट्या माहितीच्या आधारे रंगवण्यÞाचा प्रयत्न करत आहेत. मतचोरीचा खोटा गळा काढून मविआने केलेला खरा घोटाळा दाबला जात आहे. मविआच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानानंतर आम्ही निवडणूक आयोगाच्या वतीने उत्तर देत नाही आणि देणारही नाही. मात्र उघड्या डोळ्यांनी दिसणारे वास्तव समोर मांडत असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.
३१ मतदारसंघात सव्वादोन
लाख दुबार मुस्लिम मतदार
कर्जत-जामखेड, माळशिरस, धारावी, मुंबादेवी आदी ३१ विधानसभा मतदारसंघाच्या विश्लेषणानंतर तेथे २ लाख २५ हजार ७८१ मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदारांची संख्या समोर आली आहे. सर्व २८८ मतदारसंघातील हाच आकडा १६ लाख ८४ हजार २५६ वर जाऊ शकेल असा अंदाज आहे. मात्र मविआचे नेते याबाबत एक शब्द बोलत नाहीत. रोहित पवारांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात: मुस्लिम दुबार मतदार ५५३२ दुबार मुस्लिम मतदार आहेत व ते केवळ १२४३ मतांनी विजयी झाले आहेत. नाना पटोलेंच्या साकोली विधानसभा मतदारसंघातून २०८ मतांनी निवडून आले. त्यांच्या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची ४७७ दुबार मते आहेत. दुबार मतांमुळे ते निवडून आले असे म्हणायचे का? असा सवाल त्यांनी केला. जितेंद्र आव्हाड, वरुण सरदेसांई, संदीप क्षीरसागर, उत्तमराव जानकर आदी नेत्यांच्या मतदारसंघातील दुबार मतदारांची उदाहरणे त्यांना दिली.
मतदारयाद्या सदोष असल्याची कबुली
– विरोधकांकडून शेलारांचे अभिनंदन !
आशिष शेलार यांनी विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी मतदारयाद्यांमध्ये अनेक मुस्लिम दुबार नावे असल्याचे निदर्शनास आणताना मतदारयाद्या सदोष असल्याचीच अप्रत्यक्ष कबुली दिली. विरोधकांनी हाच धागा पकडत आशिष शेलार यांनी आपला दावा मान्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. दुबार मतदार हे दुबार आणि बोगस मतदार आहेत. ते कोणत्या धर्माचे आहेत हा मुद्दाच नाही. अशा मतदारांची नावे वगळली पाहिजेत अशीच आमची मागणी आहे व आशिष शेलार यांनीही मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे मान्य केले असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, मनसेचे संदीप देशपांडे आदी नेत्यांनीही सदोष मतदारयाद्या दुरुस्त केल्या पाहिजेत या मागणीचा पुनरुच्चार केला.
भाजपला मतचोरीतही हिंदू मुस्लीम दिसते
– हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला
राज्यात आणि केंद्रातील भाजपचे सरकार मतचोरी करून सत्तेत आले आहे. भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी कशी केली हे लोकसभेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केल आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. परंतु भाजपला यातही हिंदू-मुस्लीमच दिसते असे टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. भाजप नेते आशीष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आघाडीवर व्होट जिहादचा आरोप केला. या आरोपाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले, मतचोरीचा मुद्दा सर्वात आधी काँग्रेस पक्षाने उचलला. आता देशभरातील विरोधी पक्ष याप्रश्नी आवाज उठवत आहेत. निवडणूक आयोगाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुंबईत दोन दिवसापूर्वी निघालेल्या मोर्चातही काँग्रेस पक्षाने सहभाग घेतला होता. या मोर्चावेळी काँग्रेस पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि झेंडेही होते. पण भाजप त्यावरही टीका करत आहे, ते चुकीचे आहे.

