मुंबई: मराठा साम्राज्याचा देदिप्यमान इतिहास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची नावे येतात. मात्र, याच इतिहासात एक असेही नाव आहे ज्यांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची चर्चा तुलनेने कमी झाली. ते नाव म्हणजे संभाजी शहाजीराजे भोसले, म्हणजेच शिवरायांचे थोरले बंधू.रितेश यांच्या ‘राजा शिवाजी’ या भव्य ऐतिहासिक चित्रपटामुळे हे ‘हरवलेलं पान’ आता पुन्हा एकदा जगासमोर येत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन थोरल्या संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत असून, त्याच्या या दमदार लूकची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
कोण होते थोरले संभाजी महाराज?
थोरले संभाजी महाराज हे शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांचे ज्येष्ठ पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे मोठे भाऊ होते. त्यांचा जन्म १६२३ च्या सुमारास झाला होता. वडिलांप्रमाणेच ते अत्यंत पराक्रमी, धोरणी आणि कुशल योद्धा होते. शहाजीराजांच्या दक्षिण मोहिमेत आणि प्रशासकीय कामात त्यांचा मोठा वाटा होता.
अफजलखानाचा तो दगाफटका
इतिहासातील नोंदीनुसार, १६५५ मध्ये कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईत संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. ही केवळ लढाई नव्हती, तर तो अफजलखानाने केलेला एक मोठा विश्वासघात होता. अफजलखानाने कपटाने केलेल्या हल्ल्यात संभाजीराजे धारातीर्थी पडले. असे म्हटले जाते की, शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा जो कोथळा बाहेर काढला, त्यामागे स्वराज्याच्या वाटेतील शत्रूला संपवण्यासोबतच आपल्या थोरल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्याची भावनाही होती.
अभिषेक बच्चनचा मराठी चित्रपटसृष्टीत ‘डेब्यू’
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ चित्रपटातून अभिषेक बच्चन मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकत आहे. या भूमिकेसाठी अभिषेकने विशेष मेहनत घेतली असून, एका योद्ध्याची देहबोली आणि ऐतिहासिक संवादफेक त्याने प्रभावीपणे साकारली आहे. रितेश आणि अभिषेक यांची २५ वर्षांपासूनची मैत्री या निमित्ताने एका ऐतिहासिक कलाकृतीच्या रूपात समोर आली आहे. हा चित्रपट केवळ युद्धकथा नसून शिवराय आणि त्यांच्या थोरल्या भावामधील अतूट नात्यावरही प्रकाश टाकतो. मराठा इतिहासातील या महान नायकाची गाथा आता मोठ्या पडद्यावर येत असल्याने इतिहासप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही विक्रमी कमाई केली आहे.

