पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारावरून भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप म्हणजे ‘नुरा कुस्ती’ आहे. जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळे सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपचे आमदार भ्रष्टाचाराचे ‘आका’ म्हणतात, मात्र या ‘आकां’ना भाजपच्याच नेत्यांनी मांडीवर घेतले आहे, अशी टीका उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख, माजी आमदार गौतम चाबूकस्वार, निवडणूक प्रभारी अशोक वाळके, उपजिल्हा प्रमुख रोमी संधू, कैलास नेवासकर उपस्थित होते.
अंधारे म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड महापालिका कुबेराची खाण आहे, त्यामुळे सत्तेतीमधील दोन पक्ष भांडत आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका कर्जबाजारी झाली आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली पुणे, पिंपरी-चिंचवड शहराची वाट लावली आहे. समाविष्ट पुनावळे, ताथवडे भागातील नागरिक आजही मूलभूत सुविधांसाठी झगडत आहेत. असे असताना शहरातील प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप-राष्ट्रवादीचे नेते आरोप-प्रत्यारोप करून नुरा कुस्ती खेळत आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांना धमक्या देऊन निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडले.
निवडणूक आयोगाचा खोडसाळपणा
अंधारे म्हणाल्या की, निवडणूक आयोगाचा खोडसाळपणा समोर आला आहे. शिवसेना पक्षाचे मशाल चिन्ह ईव्हीएमवर ओळखता येत नाही. याबाबत आम्ही निवडणूक विभागाला लेखी पत्र देऊन आक्षेप नोंदविला आहे.
फडणवीसांमुळे राजकीय संस्कृतीचा -हास
अंधारे म्हणाल्या की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राजकीय संस्कृतीचा -हास सुरू झाला. भ्रष्टाचारावर टीका करून, इतर पक्षातील सगळे भ्रष्टाचारी भाजपमध्ये
घेऊन त्यांच्याच मांडीला मांडी
लावून बसायचे, हा त्यांचा ढोंगीपणा आहे. भाजपही गुन्हेगारांना आश्रय देणारा पक्ष झाला असून, दहशतीच्या जोरावर बिनविरोध नगरसेवक निवडून आणले जात आहेत.

