28.6 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeसोलापूरमाजी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या मान्यतांची चौकशी होणार

माजी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या मान्यतांची चौकशी होणार

सोलापूर : तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके, तृप्ती अंधारे यांनी दिलेल्या ३३ वैयक्तिक मान्यतांची चौकशी झाली आहे; मात्र त्यांनी आणखी वैयक्तिक मान्यता दिल्या आहेत. त्याचीही चौकशी करावी, असे पत्र शिक्षण उपसंचालकांनी पाठविल्यामुळे वैयक्तिक मान्यतांच्या फायलींची चौकशी होणार आहे. माध्यमिक शिक्षण विभागाकडे माहिती मागविली आहे.

तत्कालीन शिक्षणाधिकारी फडके, अंधारे यांच्या काळात जवळपास ९० वैयक्तिक मान्यता दिल्याचा दावा विविध शिक्षक संघटनांनी केला होता. त्यामुळे तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या काळातील वैयक्तिक मान्यतेच्या फायली तपासणी अहवाल पाठवावेत यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर आणि सहाय्यक लेखाधिकारी दीपक मुंढे यांची शिक्षक उपसंचालक यांनी चौकशी समिती नेमली होती.

त्या चौकशी समितीने ३३ वैयक्तिक फायलीची तपासणी केली होती, मात्र प्रहार शिक्षक संघटना आणि बहुजन हक्क अभियान संघटनेने तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्या काळातील सर्वच फायलींची तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. आता तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या काळातील फायलींची तपासणी होणार आहे. त्यामुळे या तपासणीतून किती बोगस मान्यता दिल्या आहेत, याची माहिती बाहेर पडणार का फुसका बार निघणार, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

फडके, अंधारे यांनी दिलेल्या वैयक्तिक मान्यता योग्य असल्याचा दावा त्यावेळी त्यांनी केला होता; मात्र विविध शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या अनेक वैयक्तिक मान्यता या चुकीच्या असल्याचा आरोप शिक्षक संघटना करत आहेत. त्यामुळे दोन्ही तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

वैयक्तिक मान्यतेच्या फायलींची तपासणी करण्यात आली आहे; मात्र आता फडके, अंधारे यांनी दिलेल्या सर्व वैयक्तिक मान्यतांच्या फायलींची तपासणी करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे दोन्ही तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्या काळातील सर्व वैयक्तिक मान्यतेची चौकशी होणार आहे. त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडे माहिती मागविली.आहे असे उपशिक्षणाधिकारी तथा चौकशी समिती सदस्य संजय जावीर यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR