दापोली : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपा यांच्यातील वाद चव्हाट्यावर पोहचला असून शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांचे काम करणार नाही असा इशाराच भाजपा पदाधिका-यांनी दिला आहे. दापोली मतदारसंघात शिवसेना-भाजपा यांच्यात सातत्याने संघर्ष पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यात टोकाचा वाद झाला होता. आता पुन्हा दापोलीत हा संघर्ष पाहायला मिळत आहे.
याबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे म्हणाले की, दापोली विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण प्रदुषित झाले आहे. हे प्रदुषणमुक्त वातावरण मतदारसंघात निर्माण करणे ही भाजपा कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. त्यानुसार भाजपा कार्यकर्ते वाटचाल करत आहेत. सकारात्मक राजकारण करणे म्हणजे भाईगिरीमुक्त वातावरण करणे असा त्याचा अर्थ होतो. युती म्हणून काही बंधने माझ्यावर आहेत. जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. मधल्या काळात जो काही वादंग मित्रपक्षाच्या माध्यमातून केला गेला. हा त्यांना इशारा आहे हे समजून घ्या. दापोली विधानसभेची संस्कृती जी नव्हती तशी आता परिस्थिती आहे. त्यादृष्टीने भाजपा कार्यकर्ते काम करतायेत. समजने वाले को इशारा काफी है असे त्यांनी सांगितले.
तसेच युती म्हणून भाजपा सकारात्मक आहे. युतीचा उमेदवार इथे जिंकला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्यामुळेच उमेदवार बदलून द्या अशी आमची मागणी वरिष्ठांना केली आहे. लोकसभेत जो तोटा झाला तो भरून काढण्याच्या दृष्टीने वरिष्ठांकडे मागणी केली आहे. महायुतीत ही जागा भाजपाला सोडावी. वरिष्ठपातळीवर हा निर्णय होईल. जर किंवा तर हा विषय नाही. वरिष्ठ नेत्यांना इथल्या परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. योग्य निर्णय होईल असा विश्वास आहे असं सांगत भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी स्पष्टपणे योगेश कदम यांचे काम करणार नसल्याची भूमिका मांडली आहे.
जुना अनुभव फार डेंजर : भोंडेकर
विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यात प्रत्येक इच्छुकाने मतदारसंघात तयारी सुरू केली आहे. यातच महायुतीसोबत असणा-या अपक्षांना त्यांना उमेदवारी मिळेल की नाही याची चिंता आहे. मला महायुतीकडून लढण्याची इच्छा आहे. मी आधीपासून शिवसेनेत राहिलो आहे. एकनाथ शिंदेंसोबत आहे. मात्र माझ्या जागेवर भाजपा, राष्ट्रवादीनेही दावा केलाय. त्यामुळे मीदेखील बॅकअप प्लॅन तयार ठेवला आहे असा सूचक इशारा भंडारा मतदारसंघाचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत १० अपक्ष
एकनाथ शिंदेंसोबत जे १० अपक्ष आहेत, त्यात सर्वात पहिला आधी मी त्यांच्यासोबत गेलो होतो. भंडारा जिल्ह्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र अपेक्षेनुसार न्याय मिळाला नाही. बघू पुढच्या काळात काय होते, निवडणुकीला अजून वेळ आहे. जी काही आश्वासने होती ते मुख्यमंत्री करतीलच. मंत्रिपद मिळाले असतील, महायुतीत कुणालाही मिळाले असते तर जिल्ह्याला न्याय मिळाला असता. ही खंत आमच्या मनात राहणारच आहे. वरिष्ठांनी एबी फॉर्म दिला तर लढू, द्यायचे की नाही हे त्यांच्या हातात. धनुष्यबाणावर लढण्याची इच्छा मात्र जागांवर दावा पाहता कुणाला जागा मिळते त्यावर ठरवू असे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.