26.3 C
Latur
Friday, July 18, 2025
Homeमहाराष्ट्रदेशातील पहिला ‘मध महोत्सव’ महाराष्ट्रात

देशातील पहिला ‘मध महोत्सव’ महाराष्ट्रात

महोत्सवाच्या माध्यमातून मधक्रांतीची पायाभरणी

मुंबई : मध उद्योगाची व्याप्ती वाढावी, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मधमाशा पालनाबाबत लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने देशातील पहिलाच ‘मध महोत्सव- २०२४’ महाराष्ट्रात आयोजित करण्यात येत आहे.

त्याचे पहिले आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे १८ व १९ जानेवारीला होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली. फोर्ट येथील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामीण मंडळाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, सहायक अधिकारी नित्यानंद पाटील उपस्थित होते.

साठे म्हणाले की, मधमाशी ही केवळ मध व मेण एवढ्यापुरतीच मर्यादित नसून मोठ्या प्रमाणात परागीभवनाद्वारे शेती उत्पादनात वाढ करते. मधमाशा हा निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक असून याचा थेट संबंध ग्रामीण अर्थकारणाशी जोडलेला आहे. देशातील पहिले मध संचालनालय १९४६ मध्ये महाबळेश्वर येथे स्थापन करण्यात आले. महाराष्ट्राची प्रेरणा घेऊन केंद्र शासनाने मध संचालनालय सुरू केले. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मधाचे उत्पादन वाढण्यासाठी विविध योजना राबविते.

यामध्ये प्रामुख्याने ‘मध केंद्र योजना’ तसेच ‘मधाचे गाव’ या नावीन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. मधमाशापालनातील उपउत्पादने जसे पराग, मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस, मधमाशांचे विष इत्यादी उत्पादनांची माहिती व विक्रीसाठी मधमाशापालन उद्योगाचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्यात मधाबरोबर मध, मेण यापासून तयार करण्यात आलेले उपउत्पादने व त्यांची निर्मिती करणा-या राज्यातील विविध मधपाळांचे किमान २० स्टॉल उभारण्यात येणार आहेत. मुंबईत होणा-या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहेत.

राज्यातील मधाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता, मध महोत्सवाच्या माध्यमातून मधक्रांतीची पायाभरणी या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दोन दिवसांच्या या मध महोत्सवात मधमाशांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण याबाबत परिसंवाद, शेतक-यांचे प्रशिक्षण, शरीर स्वास्थ्य आणि मध, मधाच्या गावातील लोकांचे अनुभव कथन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र हे भारतातील मधाचा सर्वांत जास्त हमीभाव देणारे राज्य असून राज्यात प्रति किलो पाचशे रुपये हमीभाव देण्यात येतो. त्याचबरोबर मधपाळांची माहिती संकलन करण्याची योजना सुद्धा राबविण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्रात १०७९ गावांमध्ये ४ हजार ५३९ मधपाळ शेतकरी मधमाशांच्या सुमारे ३२ हजार पेट्यांमधून मध उत्पन्न करीत आहेत. गेल्या वर्षी १ लाख ६० हजार मध उत्पादन झाले. त्याचे मूल्य २६९ लक्ष रुपये होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

देशाच्या सीमांवर होणार मधमाशांचा वापर
मधमाशा या त्यांना इजा पोहोचविल्यास समोरच्यावर हल्ला करून त्याला जखमी करतात. मधमाशांच्या या वैशिष्ट्याचा वापर आता देशाच्या सीमेवर शत्रूला रोखण्यासाठी करण्यात येणार असल्याचे साठे यांनी सांगितले. त्याचबरोबर मधमाशांचे विष हे दुर्धर आजारावर सुद्धा उपयुक्त आहे, याची माहिती लोकांना नाही. त्यामुळे मधमाशांचे विष काढण्याचा भविष्यातील ड्रीम प्रोजेक्ट सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR