मुंबई : ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितने एका कार्यक्रमात आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनीदेखील तिच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चांवर भाष्य केले आहे.
माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान अभिनेत्रीने आता आपण निवडणूक लढवणार नसल्याची माहिती चाहत्यांना देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. याबद्दल एका कार्यक्रमात श्रीराम नेने म्हणाले, राजकारण हा आमचा पिंड नाही.
डॉ. श्रीराम नेने पुढे म्हणाले, माधुरी दीक्षित रोल मॉडेल आहे. रोल मॉडेलचे काम समाजाला दिशा दाखवण्याचे असते. समाजात चांगल्या सुधारणा होण्याची सध्या गरज आहे. या सुधारणा झाल्या तर जगात भारत पहिल्या क्रमांकावर येईल. आपल्या देशातील मंडळी खूप हुशार आहे. राजकारण सोडून प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होता येते, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. राजकारण हा आमचा पिंड नाही. दररोज वेगवेगळ्या नवीन गोष्टी शिकण्याचा आम्ही प्रयत्न करतो. लोकांना मदत करायला आम्हाला आवडतं.