23.5 C
Latur
Thursday, January 15, 2026
Homeमहाराष्ट्रयुतीत जागावाटपाचा पेच

युतीत जागावाटपाचा पेच

शिंदे गटाचा थेट १२७ जागांवर दावा भाजपने दिली केवळ ५२ जागांची ऑफर

मुंबई : महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचे वातावरण सुरू असून महापालिकेच्या निवडणुका देखील अगदी तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सध्या जागावाटपाची बोलणी सुरू आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या आजच्या बैठकीत मुंबईतील प्रभागांच्या जागावाटपाबाबत लोकसभा विभागनिहाय चर्चा झाली असून शिंदे गटाने १२७ जागांवर दावा केला आहे तर भाजपने शिंदे गटाला केवळ ५२ जागांची ऑफर दिल्याने युती जागावाटपावरून पेच निर्माण झाला आहे.

ही बैठक दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात पार पडली असून यावेळी प्रत्येक वॉर्डमधील राजकीय समीकरण, पक्षीय बलाबल आणि यापूर्वीच्या निवडणुकीत ही जागा कोणी लढवली होती, यावर सविस्तर चर्चा झाली आहे. शिवसेनेची आधीपासूनच मुंबईत पकड असली तरी भाजपने देखील प्रत्येक प्रभागात आपली मोर्चेबांधणी करत ताकद वाढवली आहे. त्यानुसार भाजपने प्रत्येक वॉर्डनुसार नियोजन केले असून जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपचा महापौर बसवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असणार आहे.

तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे सध्याच्या घडीला मुंबईत आजी-माजी असे सगळे मिळून १२७ नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने २०१७ च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढवण्यात आलेल्या सर्वच जागांवर दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून अर्ध्याहून अधिक जागांवर दावा करण्यात आला आहे. यावर दोन्ही पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या आजच्या बैठकीनंतर प्रत्येक वॉर्डमधील दोन्ही पक्षांच्या ताकदीचा अहवाल तयार करून वरिष्ठांकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतरच जागावाटपासंदर्भातील पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

युती झाल्यास काम न करण्याचा इशाराही दिला
नाराज कार्यकर्त्यांनी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि शहराध्यक्ष संदीप लेले यांची भेट घेऊन लेखी निवेदने दिली आहेत. काही पदाधिका-यांनी तर युती झाल्यास काम न करण्याचा इशाराही दिला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळावी आणि ठाण्यात भाजपची ओळख, ताकद आणि नेतृत्व टिकून राहावे, ही त्यांची मुख्य मागणी आहे. यावर प्रतिक्रिया देताना जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांची भावना स्पष्ट आहे आणि त्यांचा रोष आम्हाला समजतो. मात्र, अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांचा असतो आणि तो मान्य करणे भाग आहे. तरीही नाराज पदाधिका-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कमी जागा मिळाल्यास असंतोष
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात प्रभाव असला, तरी भाजपनेही गेल्या काही वर्षांत शहरात मजबूत संघटन उभारले आहे. त्यामुळे जागावाटपात भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यास असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आता या पेचप्रसंगातून भाजपचे वरिष्ठ नेते कोणता तोडगा काढतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR