मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपावर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद देत स्पष्टीकरण दिले. मात्र, निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे. पत्रकार परिषद हा निवडणुक आयोगाचवा केविलवाणा प्रयत्न आहे.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या मतांच्या चोरीच्या आरोपांनंतर आज आयोगाने पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. आमच्यासाठी सर्व पक्ष समान आहेत आणि लोकांची दिशाभूल करणे हे संविधानाचा अपमान आहे असे म्हणत आयोगाने राजकारण बंद करा असा इशारा दिला. मात्र, निवडणूक आयोगाच्या या भूमिकेवर पलटवार करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी उपरोक्त टीका केली आहे.
नेमके काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. आमच्यासाठी सर्व पक्ष सारखेच आहेत, आम्ही कोणताही भेदभाव करत नाहीत. लोकांची दिशाभूल करणे हा संविधानाचा अपमान आहे, निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण बंद करा असे यावेळी निवडणूक आयोगाने म्हटले. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेवर प्रतिक्रिया देताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
रविवारी पत्रकार परिषद घेण्याची घाई का?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आयोगाच्या पत्रकार परिषदेवर टीकास्त्र सोडले. ही पत्रकार परिषद म्हणजे एक केविलवाणा प्रयत्न होता. आयोगाने आकडेवारीवर बोलायला पाहिजे होते, पण त्यांनी तसे केले नाही असे सपकाळ म्हणाले. रविवारच्या दिवशी पत्रकार परिषद घेण्याची आयोगाला एवढी घाई का होती? असा सवाल करत आयोगाने इज्जतीची लक्तरे टांगली आहेत अशी टीका सपकाळ यांनी केली.
भाजपची स्क्रीप्ट वाचून दाखवली
राहुल गांधी यांनी मतांची चोरी चव्हाट्यावर आणली आहे. आयोगाने भाजपने दिलेली स्क्रीप्ट खाली मान घालून वाचली. पत्रकार परिषदेमधून आयोगाने नाटक आणि देखावा केला आहे. आज पुन्हा एकदा ते तोंडघशी पडले आहेत असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
राहुल गांधींच्या बिहार यात्रेवर उत्तर दिले नाही
आयोगाला आज कोणीतरी सांगितले असेल की आज राहुल गांधी यांची बिहारमध्ये यात्रा आहे, ती थांबवण्याचा प्रयत्न करा. त्यांनी वस्तुनिष्ठ उत्तर दिले नाही, त्यामुळे मतांची चोरी झाली हे सिद्ध झाले, असा दावा सपळाळ यांनी केला. राहुल गांधी यांनी मतांची चोरी केल्याचा आरोप हा पुराव्यानिशी केला. ही सगळी माहिती निवडणूक आयोगाच्या दस्तावेजामधील आहे असेही त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाचा बेशरमपणा
मतदार याद्यांमध्ये झालेल्या गोंधळावर आयोगाने ‘स्थलांतरित झाल्यामुळे नाव दिसत नाही’ असा दावा पत्रकार परिषदेमध्ये केला होता. या आयोगाच्या दाव्यावर सपकाळ यांनी तीव्र आक्षेप घेतला. हा निवडणूक आयोगाचा बेशरमपणा आहे अशा कठोर शब्दांत त्यांनी आयोगावर टीका केली. दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोग आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

