मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील आरक्षणाच्या प्रश्न भाजपानेच निर्माण केला आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपाने राज्यातील जातीजातीत भांडणे लावण्याचे पाप केले आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा संपवण्याचे काम केले आहे. मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल करून सामाजिक एकोप्याला बाधा पोहोचवली आहे. आरक्षणावर सत्तेत बसलेल्या लोकांना निर्णय घ्यायचा असताना ते विरोधी पक्षांनाच विचारत आहेत. काँग्रेसची आरक्षणावर भूमिका स्पष्ट असून जातनिहाय जनगणना करणे व आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे, असे राहुल गांधी यांनी जाहीरपणे सांगितले आहे आणि हे काम केंद्र सरकारचे आहे त्यामुळे केंद्रातील भाजपा सरकारने त्यावर निर्णय घेणे अपेक्षित आहे. राज्यात व केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास आरक्षणाचा प्रश्न सोडवू.
मराठा समाजातील प्रतिनिधींनी आज पटोले यांची भेट घेतली. भेटीबद्दल बोलताना पटोले म्हणाले की, मराठा समाजातील लोकांनी भेट घेतली तेव्हा त्यांच्या समोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. आता पुन्हा कोणी भेटणार असतील तर त्यांचेही स्वागत आहे, त्यांच्याशीही चर्चा करू. लाडकी बहीण योजनेवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, मध्य प्रदेशात भाजपाने लाडली बहना ही योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणली आणि सरकार येताच ती बंद केली तसेच महाराष्ट्रातही निवडणुकीच्या तोंडावर भाजपाप्रणित महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. केवळ महिलांच्या मतांवर डोळा ठेवून या योजनेची घोषणा केलेली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणा-या योजना काँग्रेस सरकारनेच सुरू केल्या आहेत. कर्नाटक व तेलंगणात काँग्रेस सरकारची महालक्ष्मी योजना सुरू आहे आणि महाराष्ट्रात काँग्रेस मविआचे सरकार आल्यानंतर या योजना मोठ्या प्रमाणात राबवेल.