Homeमहाराष्ट्रएका युगाचा अंत ...

एका युगाचा अंत …

सिनेसृष्टीतील तिन्ही ‘खान’ आशाताईंसाठे भावुक, पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त

मुंबई : लेजेंडरी गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी समोर येताच सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. १२ एप्रिल रोजी त्यांचं निधन झालं. आशाताईंच्या निधनाने संगीत तसेच बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. मनोरंजनसृष्टीतील असंख्य कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यावेळी बॉलिवूडचे तिन्ही खान, सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांनी आशा भोसले यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. सलमान खानने आपल्या एक्सवर आशा ताईंसाठी खास पोस्ट शेअर करुन दु:ख व्यक्त केलं आहे.

भारतीय संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान : सलमान खान
सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनानंतर सलमान खान भावुक झाला. त्यानं पोस्टमध्ये शोक व्यक्त करत म्हटलं की, ‘भारतीय संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. आशाजींच्या निधनाची बातमी ऐकून मन हेलावले आहे. एक अतुलनीय आवाज…, तुमचे गाणे पिढ्यापिढ्या लोकांना प्रेरित करत राहतील..’ असं म्हणत सलमान खानने शोक व्यक्त केला आहे.

तुमची खूप आठवण येईल : शाहरुख खान
शाहरुख खान यानेही आशा भोसलेंच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. किंग खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘आशा ताईंची निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. आशा ताईंचा आवाज भारतीय सिनेसृ्ष्टीतील एक आधारस्तंभ होता. त्यांचा आवाज कायम जगभरात गुंजत राहिल. इतर लोकांच्या प्रतिभेपेक्षा अधिक काळ त्यांची प्रतिभा लोकांमध्ये जिवंत राहिल. त्यांनी माझ्यावर कायम प्रेम आणि आशीर्वादाचा वर्षाव केला आहे. मला तुमची खूप आठवण येईल.. आशा ताई, तुमच्या आत्म्यास शांती मिळो..लव्ह यू..’, असं म्हणत शाहरुख खानने आशा ताईंसोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे.

‘एका युगाचा अंत’ : आमिर खान
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननेही आशा ताईंच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. ‘मी आशा ताईंचा मोठा चाहता आहे. संपूर्ण सिनेइंडस्ट्रीला, देशाला, संपूर्ण जगाला मोठा धक्का बसला आहे. ही दु:खद बातमी आहे. सिनेसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. एका युगाचा अंत झाला आहे’, अशी भावना आमिर खानने व्यक्त केली.

आशा ताईंच्या निधनावर सेलिब्रिटींसह नेते मंडळींनी पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून उद्योगपती अनंत अंबानींपर्यंत अनेक दिग्गजांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. आशा ताईंच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार केले जातील. यावेळी संगीत जगतातील दिग्गजांह सेलिब्रिटी उपस्थित राहतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR