Homeमहाराष्ट्र४० माओवाद्यांसह ‘पीएलजीए’च्या जहाल कमांडरने टेकले गुडघे

४० माओवाद्यांसह ‘पीएलजीए’च्या जहाल कमांडरने टेकले गुडघे

गडचिरोली : तेलंगणा व छत्तीसगड सीमावर्ती भागात गेल्या अनेक वर्षांपासून दहशतीचे साम्राज्य निर्माण करणा-या नक्षलवादी चळवळीचा पाया आता पूर्णपणे हादरला आहे. नक्षल्यांच्या पीएलजीए (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) चा जहाल कमांडर सोडी केशालू ऊर्फ मल्ला याने आपल्या ४० सहका-यांसह पोलिसांसमोर ७ एप्रिल रोजी शरणागती पत्करली. यामुळे माओवाद्यांचे बटालियन विखुरले असून सीमावर्ती भागात हिंसक चळवळीला ओहोटी लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

​शरण आलेल्या या नक्षल्यांनी केवळ आत्मसमर्पण केले नाही, तर त्यांच्याकडील एके-४७, इन्सास आणि एसएलआर सारख्या आधुनिक स्वयंचलित शस्त्रांचा साठाही पोलिसांकडे सुपूर्द केला. सध्या केशालू हा संघटनेतील सर्वात प्रभावी मोहरा मानला जात होता. कर्रेगुट्टा टेकड्यांच्या दुर्गम भागात वावरणारा हा जहाल कमांडर २५ हून अधिक माओवादी तुकड्यांचे नेतृत्व करत होता. तो आता मुख्य प्रवाहात सामील झाल्याने माओवाद्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

आत्मसमर्पणाची मालिका सुरुच
वर्षाच्या सुरुवातीला २ जानेवारी रोजी पीएलजीए बटालियन-१ चा कमांडर बारसा देवा ऊर्फ देवन्ना याने शस्त्र म्यान करुन गुडघे टेकले होते. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी नक्षलवादी चळवळीत ४० वर्षे घालवलेला आणि पॉलिटब्युरोचा सर्वोच्च नेता ६२ वर्षीय थिप्पिरी तिरुपती ऊर्फ देवजी याने पोलिस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. यावेळी त्याच्यासोबत वरिष्ठ नेता मल्ला राजी रेड्डीसारखे महत्त्वाचे नेते होते. त्यानंतर ७ मार्च रोजी हैदराबादमध्ये १३० नक्षल सदस्यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत सामूहिकरीत्या शरणागती पत्करली होती. आता या यादीत जहाल कमांडर सोडी केशालू ऊर्फ मल्ला याचा समावेश झाला आहे.

माओवाद्यांची तेलंगणा राज्य समिती संपुष्टात
पोलिसांचा वाढता दबाव आणि शासनाच्या विकास योजनांमुळे नक्षलवादी आता भरकटत असल्याचे चित्र आहे. तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वरिष्ठ नेत्यांनी शस्त्रे सोडल्यामुळे आता ही चळवळ पूर्णपणे खिळखिळी झाली असून तेलंगणा राज्य समितीचे अस्तित्व आता संपुष्टात आल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR