सोलापूर : हिंदूराष्ट्राच्या मुद्यावर देशातील मुस्लीम समाजाला बिचकावण्याचा प्रयत्न संघ परिवार नव्हे तर काही विरोधी पक्षांकडूनच होत आहे, असा आरोप करीत, संघ परिवाराची हिंदूराष्ट्राबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान म्हणून हिंदुत्व आणि हेच हिंदुत्व, हिंदूराष्ट्रासाठी अभिप्रेत आहे, असा दावा अयोध्येतील श्रीराम जन्माभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरी यांनी केला आहे.
देशात वाढलेला भ्रष्टाचार, भ्रष्टाचारांचा आरोप असलेल्या नेत्यांना सत्ताधारी पक्षात पावन करून घेणे अशा माध्यमातून वाढत चाललेल्या नैतिकमूल्यांच्या घसरणीला आजचे सत्ताधारी नाहीत तर पूर्वीचे सत्ताधारीच जास्त जबाबादार आहेत, असाही आरोप त्यांनी काँग्रेसचा थेट नामोल्लेख टाळून केला. अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिराकडे हिंदू-मुस्लीम संघर्षाचे प्रतीक म्हणून नव्हे तर परकीय आक्रमक आणि संरक्षकांचा संघर्ष म्हणून पाहायला हवे. यात हिंदू-मुस्लीम संघर्षाच्या भावनेतून दोन्ही समाजाला चिथावणे घातक आहे. ही मानसिकता सत्ताधारी नेत्यंमध्ये नाही असाही दावा आचार्य गोविंददेव गिरी यांनी केला. सोलापुरात सम्राट चौकात किशोर भट्टड यांच्या निवासस्थानी वार्तालप करताना ते बोलत होते.
अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापित होत असताना त्याचा सोहळा १७ जानेवारीपासून सुरू होत आहे. १७ जानेवारी श्रीरामलल्लाच्या देखण्या मूर्तीचे आगमन होईल. दुस-या दिवसापासून तेथे शास्त्रोक्त रामानंदी सांप्रदाय पध्दतीने पूजा विधानास प्रारंभ होईल. पण त्या अगोदर वैदिक कर्मकांड मान्य असलेल्या सर्व सांप्रदायांप्रमाणे पूजा विधी होणार आहे. यात देशातील काश्मीरपासून ते अगदी नागालॕन्ड व मिझोरामपर्यंतच्या १५० वैदिक विद्वानांचा सहभाग राहणार आहे.
अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिराची उभारणी अद्यापि पूर्ण झाली नाही. केवळ गर्भगृह आणि दर्शनबारीचा भाग पूर्ण झाला असताना आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मंदिराची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. यामागे संघ परिवाराचा राजकीय लाभ मिळविण्याचा हेतू असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आचार्य गोविंददेव गिरी यांनी, आता अशा राजकारणाची देशाला सवयच लागली आहे. राष्ट्रकारण, राजकारण, पक्षीय राजकारण या गोष्टी विभिन्न आहेत. श्रीराम कोणा एकाचे असू शकत नाहीत. तर संपूर्ण देशवासियांचे आहेत. निदान त्याचे तरी राजकारण होऊ नये, असेही मत त्यांनी व्यक्त केले. श्रीराम हे मासांहारी होते, असा दावा कोणी करीत असेल. पण श्रीराम हे क्षत्रीयच होते. त्यांना मांसाहारी संबोधण्यापेक्षा त्यांच्या उच्चकोटीच्या जीवनमूल्यांकडे पाहायला हवे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

