Homeराष्ट्रीयमुलाच्या कौतुकाचा सुवर्ण सोहळा अधुराच राहला

मुलाच्या कौतुकाचा सुवर्ण सोहळा अधुराच राहला

सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू

उज्जैन : आयुष्यभर ज्या दिवसाची वाट पाहिली, तो दिवस आला खरा; पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. मुलाच्या आयुष्यातील सर्वात मोठा अभिमानाचा क्षण, म्हणजेच पदवीदान सोहळा पाहण्यासाठी उज्जैनहून कलबुर्गीत आलेल्या एका पित्याचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

लेकाने व्यासपीठावर दोन सुवर्णपदके उंचावताना वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू असावेत असे स्वप्न पाहिले होते, परंतु नियतीने या आनंदाचे रूपांतर एका क्षणात दु:खात केले. शिवकुमार शर्मा (वय ५९, रा. उज्जैन, मध्य प्रदेश) असे या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा दिव्यांशू सक्सेना कलबुर्गी येथील सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटकमध्ये बी. टेकचे शिक्षण घेत आहे.

दिव्यांशूने आपल्या अभ्यासातून विद्यापीठात चमकदार कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली. मंगळवारी (२२ एप्रिल) पार पडलेल्या विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभात हा ऐतिहासिक क्षण साजरा होणार होता. मुलाच्या या गौरवाचे साक्षीदार होण्यासाठी शिवकुमार शर्मा उत्साहाने मध्य प्रदेशातून कलबुर्गीला पोहोचले होते. बुधवारी सकाळी ते एका ऑटोने विद्यापीठ परिसराकडे (कडागांची गाव, अलंदा तालुका) निघाले होते.

मात्र, काळाचा घाला अशा प्रकारे पडला की, वाटेतच ऑटोचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ऑटो उलटली. या भीषण अपघातात शिवकुमार शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. ऑटोमधील इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असली, तरी शिवकुमार यांची मात्र प्राणज्योत मालवली.

एकीकडे विद्यापीठाच्या व्यासपीठावर दिव्यांशू सुवर्णपदक स्वीकारत असताना, दुसरीकडे त्याचे वडील त्याच परिसरात असलेल्या रुग्णालयात शवगृहात होते. मुलाच्या यशाची बातमी समजण्याआधीच वडिलांच्या मृत्यूची बातमी धडकल्याने संपूर्ण परिवार कोलमडून गेला आहे. या घटनेने दिव्यांशूच्या मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR