वृंदावन : येथे आयोजित एका कथेदरम्यान, एका भाविकाने अनिरुद्धाचार्य यांना विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकवल्या. स्वामीजी, नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे देशभरातील लाखो तरुण कमालीचे अस्वस्थ आहेत. काही विद्यार्थ्यांनी तर नैराशातून टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. लाखो रुपयांचा खर्च आणि अफाट मेहनत करूनही परीक्षा रद्द झाल्यामुळे प्रामाणिक आणि हुशार विद्यार्थ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. सरकार यावर ठोस पावले का उचलत नाही? असा सवाल भाविकाने केला.
या भावनिक प्रश्नाचे उत्तर देताना स्वामी अनिरुद्धाचार्य यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले. ते म्हणाले की, सरकारची इच्छा आहे की तुम्ही वाचू नका, शिकू नका. कारण जर तुम्ही शिकलात-सुधरलात, तर तुम्ही सरकारकडे नोक-या मागायला लावाल. सरकारला तर असे वाटते की तुम्ही न शिकता महिना १००० ते ५००० रुपये त्यांच्याकडून घ्यावे आणि गप्प राहावे.
पुढे बोलताना त्यांनी सध्याच्या परीक्षा पद्धतीवर जोरदार टीका केली. आज परिस्थिती अशी आहे की, तुम्ही अभ्यास करून परीक्षा देता आणि नंतर कळते की पेपर लीक झाला असून परीक्षा रद्द झाली आहे. आता पुढची परीक्षा कधी होईल, हे कोणालाच माहीत नाही. तोपर्यंत तरुणांचे वय निघून गेलेले असते. वयाची मर्यादा संपल्यामुळे नंतर ते परीक्षेस पात्र राहतील की नाही, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. आपल्या देशातील हा खूप मोठा घोटाळा आहे असेही अनिरुद्धाचार्य म्हणाले.
नीट परीक्षांमधील गैरव्यवहार, ग्रेस मार्क्सचा वाद आणि पेपर लीकच्या प्रकरणांमुळे देशभरात सुप्रीम कोर्टापर्यंत लढा सुरू आहे. एनटीए या परीक्षा घेणा-या संस्थेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. परीक्षा रद्द होणे किंवा पुन्हा परीक्षा घेणे, यामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक दबाव निर्माण झाला आहे.
















