नवी दिल्ली : जनगणनेत इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) स्वतंत्र नोंदीची मागणी करणा-या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निकाल दिला. हा एक धोरणात्मक निर्णय असून यावर केवळ सरकारच विचार करू शकते, असे सरन्यायधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. मात्र देशाच्या जनगणना रजिस्ट्रार जनरल यांच्यासमोर याचिकाकर्त्यांना आपली मागणी मांडण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.
ओबीसी फेडरेशन ऑफ इंडियातर्फे ही याचिका केली होती. या याचिकेत ऑनलाइन जनगणनेच्या फॉर्ममध्ये इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र ड्रॉप-डाउन मेनू देण्याची मागणी करण्यात आली होती. या याचिकेवर बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
याचिकेतील मागण्या काय?
ऑनलाईन जनगणना फॉर्ममध्ये ओबीसी जातींसाठी एक ड्रॉप-डाउन मेनू असावा. जनगणनेच्या शेड्यूलमधील कॉलम नंबर १० मध्ये अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) साठी पर्याय आहेत. परंतु इतर जातींसाठी ‘ओपन टेक्स्ट फील्ड’ दिले आहे. यात नागरिकांना स्वत:च्या जातीचे नाव टाईप करावे लागते. २०११ च्या जनगणनेत ज्याप्रमाणे एससी आणि एसटी प्रवर्गासाठी स्वतंत्र पर्याय होते, तसेच नियम ओबीसी साठीही लागू करावेत.
















