कासा : अल्पवयीन मुलीवर ५५ वर्षीय आरोपीने गावठी औषध देण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्यानंतर बुधवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी कासा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. महाराष्ट्रात घडलेल्या चारही घटना निंदनीय असून याबाबतीत अशा आरोपींना मदत करणा-यांवरही कठोरातील कठोर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी, त्याचप्रमाणे याबाबतीत कठोर कायदा आणून गुन्हेगारांना शिक्षा व्हावी. या चारही निंदनीय घटनांची माहिती घेण्यात येणार असून, याबाबतीत काही कायदे करणे आवश्यक असल्याचे मत नीलम गो-हे यांनी व्यक्त केले.
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनीही बुधवारी कासा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक प्रकरणांमध्ये ९० दिवसांच्या आत चार्जशीट दाखल होत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या अत्याचार प्रकरणांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा आणण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंधश्रद्धाविरोधी कायदा अधिक कडक करण्याची गरज असून, तो प्रभावीपणे लागू केला गेला पाहिजे, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. या प्रकरणातील आरोपी भोंदूबाबाला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यास ९ मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

