पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पोलिसांच्या कारवाईनंतरही गुन्हेगारांवर वचक बसलेला नाही. अशातच महिलांवर दगडाने हल्ला करणा-या एका माथेफिरूला पोलिसांनी अटक केली आहे. या माथेफिरूने आतापर्यंत १० महिलांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. हा आरोपी नव्या को-या गाड्यांना देखील लक्ष्य करत होता. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने स्थानिक लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. तसेच पोलिस इतके दिवस या आरोपीकडे दुर्लक्ष का करत होते असा आरोपही स्थानिक नेत्यांनी केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
पुण्याच्या हडपसरमध्ये वैदुवाडी येथे महिलांवर दगडफेक करून त्यांना जखमी करण्याचे धक्कादायक प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होते. त्यामुळे वैदुवाडी येथे धुमाकूळ घालणा-या दगडी गँगच्या म्होरक्याला पाठलाग करून शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख उल्हास तुपे आणि तेथील स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. वैदुवाडी येथे पुलावर येण्यासाठी ब्रिजच्या खालून दोन रस्ते आहेत.
आरोपी पुलाच्या जिन्याने वर येऊन भर रस्त्यात महिलांच्या डोक्यामध्ये तसेच वाहनांवरती दगडफेक करत होता. त्यामुळे या परिसरात दहशत निर्माण झाली होती. योगेश नामदेव कांबळे (रा. वैदुवाडी मार्तंड वस्ती) असे आरोपीचे नाव आहे. वैदुवाडी पुलावर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेला हा प्रकार कुठेतरी थांबणे गरजेचे होते.