Homeनांदेडतिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी साईलाला गजाआड

तिहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी साईलाला गजाआड

२८ पर्यंत पोलिस कोठडी

नांदेड : प्रतिनिधी
शहरात दि.४ एप्रिल रोजी घडलेल्या दोन टोळ्यातील गँगवॉरमध्ये तिघांची हत्त्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी साईलाला याच्यासह अन्य एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २२ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून अटक केली आहे.

शहरातील ई-स्क्वेअर जवळ ४ एप्रिल रोजी रात्री २ टोळीत गँगवार झाले होते. त्यात अर्जितसिंह चव्हाण, सय्यद आवेज, मोहम्मद अरबाज यांचा खून झाला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व भाग्यनगर पोलिसांनी सोनू राऊत, साहेर, शाहरुख उर्फ कबूतर शेख अजगर, शेख उबेद शेख अजगर यांना अटक केली होती. फरार आरोपींना पकडण्यासाठी नांदेड जिल्हा, सोलापूर, पुणे येथे स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथके शोध घेत होती.

दरम्यान २१ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे यांना फरार आरोपी साईलाला दीपकसिंग गहेरवार(रा. बालाजी मंदिर, सिडको) नितेश परमेश्वर इंगळे (रा. शिवनगर, महाराणा प्रताप चौक ) उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सुनील भिसे व त्यांच्या पथकाने २२ एप्रिल रोजी वाराणसी स्थानिक पोलिसांची मदत घेत उपरोक्त २ आरोपींना शिताफीने पकडले. त्यांच्याकडे या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्यावरून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या पथकात हवालदार ब्रह्मानंद लामतुरे, शिवराज ढवळे, प्रदीप गर्दनमारे, राजू बुंगई, व्यंकट गंगुलवार, हेमंत बिचकेवार व सायबर सेलचे हवालदार राजेंद्र सिटीकर दीपक ओढणे यांचा समावेश होता.

दरम्यान या प्रकरणातील आरोपींना न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची म्हणजे २८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR