छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळासाठी औषध आणायचे असल्याचे सांगून एका महिलेने दुस-या महिलेकडे आपल्या आठ महिन्यांच्या बाळाला देऊन पळ काढला आहे.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान आता पोलिसांकडून बाळाला सोडून फरार झालेल्या आईचा शोध घेतला जात आहे.
अधिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक २७ जवळ चेह-याला स्कार्फ बांधलेली एक महिला बसलेली होती.
तिच्याजवळ एक ८ महिन्यांचे बाळ देखील होते. दरम्यान, तिथेच उभा असलेल्या एका महिलेकडे तिने औषधी आणण्याच्या बहाण्याने बाळ सोपवले. माझ्या बाळाला सांभाळा औषधी घेऊन लगेच येते, असे सांगत ती बाळाला सोडून गेली. परंतु, बराच वेळ होऊनही बाळाची आई परत आली नसल्याने महिलेने शोधाशोध केली. पण ती कुठे दिसली नाही. त्यामुळे संबंधित महिलेने इतरांच्या मदतीने वैद्यकीय अधीक्षक कार्यालय गाठले आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला.