मुंबई : राम मंदिराच्या उद्घाटनाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिर ट्रस्टकडून देशातील मान्यवर राजकीय लोकांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. पण महाराष्ट्रातील नेत्यांना मात्र अद्याप अशा स्वरूपाचे निमंत्रण पाठवण्यात आलेले नाही.
शिवसेना नेते उद्धव ठाकरेंना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देखील अद्याप निमंत्रण आले नसल्याचे समोर आले आहे. पण पवारांनी राम मंदिरावरून सध्या भाजपचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
शरद पवारांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना म्हटले की, मला अद्याप राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण आलेले नाही. भाजप सध्या राम मंदिराच्या नावाने राजकारण करत आहे. जनतेचा पाठिंबा मिळावा यासाठी सत्ताधारी पक्षाकडे सध्या कुठलाही ठोस कार्यक्रम नाही. त्यामुळे ते राम मंदिरावरून जनतेमध्ये वेगळा मतप्रवाह तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.
ठाकरे बंधूंनाही निमंत्रण नाही
दरम्यान, महाराष्ट्रात कायम हिंदुत्वाच्या राजकारणात आघाडीवर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यात आता शरद पवारांनीही निमंत्रण न मिळाल्याचे सांगितल्याने महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना जाणीवपूर्वक या सोहळ्यापासून डावलण्यात आले आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे. पण या निमंत्रणाच्या वादावर राम जन्मभूमी ट्रस्टने किंवा सत्ताधारी भाजपने कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे या विषयावरून राजकारण होतेय अशी सध्या चर्चा सुरू आहे.