धुळे : प्रतिनिधी
दोन आठवड्यानंतर दिवाळीसाठी घरोघरी लाडू करण्यासाठी वापरली जाणारी हरभरा डाळ यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रति किलोमागे तब्बल १५ ते २० रुपयांनी महागली आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगलाच झटका बसत आहे. त्यामुळे यंदा सामान्यांसाठी दिवाळी काहीशी तिखटच होणार असल्याचे चित्र आहे.
खाद्यतेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सामान्यांना घर चालवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. हरभरा डाळीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, मसूर डाळ आणि उडीद डाळीच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. तूरडाळीच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. परंतु, मूगडाळीचे दर स्थिर आहेत.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये घाऊक बाजारात हरभरा डाळीचे दर प्रतिंिक्वटलला साडेसात सात हजार ते ७ हजार ६०० रुपये इतके होते. ते सद्य:स्थितीत सरासरी नऊ हजार २०० ते नऊ हजार ४०० रुपये आहेत. किरकोळ बाजारात सरासरी ९५ ते १०० रुपये प्रति किलो हरभरा डाळीचे दर आहेत.
डाळीचा साठा नाही
यंदा हरभरा डाळीचा साठा नाही. त्यामुळे मालाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होत आहे. उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेत आवकही कमी होत आहे. आगामी काळात काही प्रमाणात भाव घटतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अन्य सर्व प्रकारच्या डाळींचे दर हे गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास स्थिरच आहेत.