22.6 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeराष्ट्रीयपीठ, डाळींचे दर आता गगनाला भिडणार!

पीठ, डाळींचे दर आता गगनाला भिडणार!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाचे भाव १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. दुसरीकडे स्थानिक पातळीवर पीठ आणि डाळींच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसू शकतो. गहू आणि डाळींचे घटलेले उत्पादन हे त्याचे प्रमुख कारण आहे.

गहू आणि डाळींच्या पेरण्या पुन्हा एकदा कमी झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत गव्हाच्या पेरणीत ५ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. दुसरीकडे डाळींच्या पेरणीत आठ टक्क्यांपर्यंत घट झाली. मात्र, पावसानंतर ही कमतरता भरून काढता येईल, अशी सरकारला आशा आहे. परंतु पावसामुळे नुकसानही खूप झाले आहे. त्यातच आता पाऊस झाला असला तरी भविष्यात पाण्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे रबी पिकेही संकटात सापडली आहेत. तसेच यातून पिकाचे उत्पादन घटणार आहे. यंदा डाळीचे उत्पादन घटले. तसेच गव्हाचे उत्पादनही घटण्याची शक्यता आहे. कारण गव्हाला पाणी जास्त लागते. प्रत्यक्षात अनेक भागात दुष्काळी स्थिती असल्याने देशात पीठ आणि डाळीचे भाव वाढतील. त्यामुळे देशात महागाईच्या झळा आणखी तीव्र होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

यापुढेही जर पेरणी वाढली नाही तर देशात डाळी आणि गहू किंवा मैदा आणि डाळीच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे देशात चलनवाढीचा दर वाढू शकतो. अलिकडच्या काही महिन्यांत देशातील जनतेला टोमॅटो आणि नंतर कांद्याच्या महागाईचा सामना करावा लागला. आता दोन्ही पिकांच्या पेरण्या वाढल्या नाहीत तर सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट वाढणार आहे.

गव्हाच्या पेरणीत घट
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशात गहू आणि डाळींच्या पेरणीत मोठी घट झाली आहे. प्रत्यक्षात पावसाअभावी पेरणीवर परिणाम झाला आहे. देशात गव्हाचा पेरा ५ टक्क्यांनी घटला आहे. यावर्षी आतापर्यंत १४१ लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली तर गतवर्षी याच कालावधीत १४९ लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली होती.

डाळींच्या पेरणीत ८ टक्के घट
दुसरीकडे डाळींवरही महागाईचे संकट उभे ठाकले आहे. यंदा डाळींच्या पेरणीत ८ टक्के घट झाली आहे. आता देशात ९४० लाख हेक्टरवर डाळींची पेरणी झाली तर गतवर्षी याच कालावधीत १०३ लाख हेक्टरवर ही पेरणी झाली होती. म्हणजेच यंदा डाळींच्या उत्पादनात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR