19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयराम मंदिराचा मुद्दा प्रचाराचा विषय नाही

राम मंदिराचा मुद्दा प्रचाराचा विषय नाही

लखनौ : देशभरात १९ एप्रिलपासून लोकशाहीचा उत्सव म्हणजेच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. आता देशातील पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी, २० मे रोजी मतदान होणार आहे. यानंतरही आणखी दोन टप्प्यातील मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या मेनका गांधी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील सुलतानपूर मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. आपल्या मतदारसंघात त्या विविध सभा-मुलाखती देत आहेत आणि विचार मांडताना दिसत आहेत. तशातच मेनका गांधी यांनी प्रभू श्रीराम आणि राम मंदिर या मुद्यावर मत मांडले.

राम मंदिराचा मुद्दा प्रचाराच्या चर्चेत यायची गरज नाही. प्रत्येकजण आनंदी आहे. अतिशय सुंदर भव्य राम मंदिर बांधले आहे. प्रभू श्रीराम प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नाही. वरुण गांधी देखील लवकरच येथे येत आहेत. ते एक-दोन दिवसांत येऊन प्रचाराला सुरुवात करतील. आम्ही ५ वर्षांपासून सुलतानपूरमध्ये काम करत आहोत. लोकांशी नाते निर्माण झाले आहे. त्या नात्याच्या जोरावर आणि जनतेच्या कामाच्या जोरावर आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत. आम्ही जिंकू आणि जनतेलाही आम्हाला जिंकवून द्यायला आवडेल असा विश्वास मेनका गांधी यांनी व्यक्त केला.

आम्ही हिंदू आणि मुस्लिमांबद्दल अजिबात बोलत नाही, हिंदू-मुस्लिम या मुद्यांवर बोलणे हा मूर्खपणा आहे. माझी निवडणूक यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या प्रकरणी माझी शून्य सहनशीलता आहे. सुलतानपूरमध्ये सर्वांची कामे होतात आणि येथे सर्वांचे संरक्षण होते. माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. हिंदू आणि मुस्लिमांबद्दल बोलणे हा एक प्रकारे वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे असे मेनका गांधी यांनी ठणकावले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR