मुंबई : शनिवारी मुंबई विमानतळावर इंडिगोच्या ए ३२१ विमानाच्या शेपटीचा भाग धावपट्टीला आदळला. एअरलाइनने सांगितले की, खराब हवामानामुळे पायलटने लँडिंग करण्याऐवजी पुन्हा एकदा फिरण्याचा (टेकऑफ प्रक्रिया) निर्णय घेतला. या दरम्यान, विमानाच्या शेपटीचा भाग धावपट्टीला धडकला.
इंडिगोने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की आज ए३२१ विमानाने कमी उंचीवर एक फेरी मारली. या दरम्यान, शेपटीचा भाग धावपट्टीला स्पर्श झाला. नंतर दुस-या प्रयत्नात विमान सुरक्षितपणे उतरले. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याचे एअरलाइनने म्हटले आहे. घटनेनंतर विमानाची तपासणी आणि दुरुस्ती केली जाईल आणि आवश्यक नियामक मान्यता मिळाल्यानंतरच ते पुन्हा कार्यान्वित केले जाईल. यापूर्वी २१ जुलै रोजी मुंबई विमानतळावर लँडिंग करताना एअर इंडियाचे एआय२७४४ विमान धावपट्टीवरून घसरले. हे विमान कोचीहून मुंबईला आले होते. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे धावपट्टी निसरडी होती, ज्यामुळे विमान धावपट्टीपासून १६ ते १७ मीटर अंतरावर गवतावर गेले.
चित्रांमध्ये विमानाच्या उजव्या इंजिनचे नॅसेल (झाकण) खराब झाल्याचे दिसून आले. या घटनेनंतर, विमान पार्किंगमध्ये आणण्यात आले, जिथे सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सना उतरवण्यात आले. या दरम्यान, विमानाचे तीन टायर फुटले. एअर इंडियाने सांगितले की, या अपघातात कोणत्याही प्रवाशांना किंवा क्रू मेंबर्सना दुखापत झाली नाही. तथापि, मुंबई विमानतळाच्या मुख्य धावपट्टी, ०९/२७ चे नुकसान झाले आहे. धावपट्टीवरील विमान वाहतूक थांबवण्यात आली आहे. धावपट्टीवरील तीन सूचना फलक आणि चार दिवे देखील तुटले आहेत.

