मुंबई : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचखोरीच्या घटनेमुळे राज्य सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्या गेल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या घटनेच्या निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारकून राजेंद्र ढेरंगे यांना ५० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली आहे. चक्क मंत्रालयात लाचखोरीची ही घटना घडल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. मंत्री झिरवाळ यांनी या प्रकरणाशी आपला संबंध आढळला तर आपण तात्काळ राजीनामा देऊ अशी भूमिका स्पष्ट केली आहे. पण राजेंद्र ढेरंगे यांनी झिरवाळ यांचे स्विय सहाय्यक रामदास गाडे यांच्या सूचनेनुसारच ही लाच घेतल्याचा दावा केला आहे. यामुळे झिरवाळ यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
लाच स्वीकारण्याची वरिष्ठांची मागणी
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील कर्मचा-याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यामुळे लाचलुचपत विभागाने मंत्री कार्यालय सील केले आहे. या घटनेने राज्य सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. चौकशीदरम्यान वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचे या कर्मचा-याने सांगितल्याची माहिती समोर येत आहे. हे आणखी धक्कादायक आणि गंभीर आहे. त्यामुळे मंत्री झिरवाळ यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिका-यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. मात्र नैतिक जबाबदारीच्या दृष्टीने, आपल्या कार्यालयात खुलेआम लाचखोरी सुरू असल्याचे समोर आल्यावर निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
झिरवाळ काय म्हणाले?
नरहरी झिरवाळ यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना या प्रकरणी आपली बाजू स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, काल घडलेला प्रकार साफ चुकीचा आहे. असे व्हायला नको होते. काल ज्यांना पकडण्यात आले, ते क्लार्क म्हणून काम करतात. ते मूळचे अन्न व पाणी पुरवठा विभागाचे आहेत. त्यांना उसणवारीवर घेतले होते. मी या प्रकाराला पाठिशी घालणार नाही. शासकीय किंवा कायदेशीर बाब असेल त्याला त्याचा जाब द्यावा लागेल, असे ते म्हणाले.
आरोपी ढेरंगेला १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी
लाचखोर क्लार्क राजेंद्र ढेरंगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज कोर्टापुढे हजर केले. तिथे कोर्टाने त्याची १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित लाचप्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणारे नरहरी झिरवाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट करत अनेक मुद्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध सिद्ध झाल्यास नैतिकतेच्या मुद्यावर तात्काळ राजीनामा देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. जर माझी कोणतीही ‘लिंक’ आढळली, तर पदावर राहण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.

