23.4 C
Latur
Sunday, March 8, 2026
Homeअंतरराष्ट्रीयमध्य पूर्वेत परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण

मध्य पूर्वेत परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण

इराण, दुबईसह अन्य देशांमध्ये लाखो अडकले सुरक्षित मायदेशात आणण्याची कशी तयारी?

तेहरान : अण्वस्त्रनिर्मिती रोखण्यासाठी करार करण्याकरिता चर्चेच्या तीन फे-या अपयशी ठरल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर जोरदार हल्ले चढविले. या हल्ल्यात इराणमध्ये २०० पेक्षा अधिक जण ठार झाले. दक्षिण इराणमध्ये मिनाब येथे शाळेला लक्ष्य करण्यात आले, यात ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इराणने इस्रायलसह आठ देशांवर प्रतिहल्ले केले. यामुळे अनेक ठिकाणची विमानसेवा बंद करण्यात आली असून, शेकडो भारतीय अडकल्याची माहिती मिळाली आहे.

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर मध्य पूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. अद्यापही हल्ले सुरूच आहेत. अनेक देशांनी हाय अलर्ट जारी केला आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेक मध्य पूर्वेतील देशांमधील भारतीय दूतावासांनी त्यांच्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, पॅलेस्टाईन, कतार आणि इराणमध्ये राहणा-या किंवा प्रवास करणा-या भारतीयांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच तेल अवीवमधील भारतीय दूतावासाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय नागरिकांना इस्रायली प्रशासन आणि होम फ्रंट कमांडच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळावा असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या भागातील परिस्थिती अजूनही गंभीर आहे. अनेक देशांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. भारतीय दूतावास सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा सल्ला देत आहेत. एकंदरीत, मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि त्यांच्या दूतावासांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
तेहरान येथील भारतीय दूतावासाने इराणमध्ये राहणा-या भारतीय नागरिकांसाठी एक नवीन सूचना जारी केली आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दूतावासाने सर्व भारतीयांना जास्तीत जास्त सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे आणि शक्य तितके घरातच राहावे. भारतीय नागरिकांना नियमितपणे माहिती घेण्याचा, परिस्थितीबद्दल अपडेट राहण्याचा आणि दूतावासाकडून पुढील माहितीची वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी काही नंबर जारी करण्यात आले आहेत.

भारतीय नागरिकांना सूचना
अबू धाबीमधील भारतीय दूतावासाने युएईमध्ये राहणा-या भारतीयांना सतर्क राहण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे. रियाधमधील भारतीय दूतावासाने सौदी अरेबियातील भारतीयांना स्थानिक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. बहरीन आणि पॅलेस्टाईनमधील भारतीय दूतावासांनीही सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

एअर इंडिया, इंडिगोची विमाने रद्द
तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय विमान कंपन्यांनीही खबरदारीचे उपाय केले आहेत. एअर इंडियाने मध्य पूर्वेला जाणारी अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. दिल्लीहून तेल अवीवला जाणा-या एअर इंडियाच्या विमानाला परत बोलावण्यात आले. इंडिगोने इराणच्या हवाई हद्दीतून जाणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेसने पश्चिमेकडे जाणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित केली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR