16 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील सर्वात मोठी व्याघ्र पुनर्स्थापना मोहीम सुरू

राज्यातील सर्वात मोठी व्याघ्र पुनर्स्थापना मोहीम सुरू

ताडोबाहून सह्याद्रीत तारा, ट्रान्सलोकेशन यशस्वी

ताडोबा-अंधारी : महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाला नवी चालना देण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील ८ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण करण्यास पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

सुमारे तीन वर्षांची ही वाघीण टी२०-एस-२ म्हणून ओळखली जाते. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसांगी परिक्षेत्रातून ती एनटीसीएने ठरवलेल्या सर्व सुरक्षाविषयक नियमांचे पालन करून पकडण्यात आली. पकडल्यानंतर तिला प्राथमिक उपचार देण्यात आले आणि प्रकृती स्थिर ठेवल्यानंतर विशेष तयार करण्यात आलेल्या वन्यजीव वाहतूक वाहनातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलवण्यात आले. ही संपूर्ण कारवाई अत्यंत दक्षतेने आणि प्रशिक्षित पथकाच्या उपस्थितीत करण्यात आली. स्थलांतरादरम्यान वाघिणीच्या आरोग्यावर सतत नजर ठेवण्यात आली होती आणि ताडोबातील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एस. खोब्रागडे यांनी संपूर्ण आरोग्य तपासणीची जबाबदारी सांभाळली.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पोहोचल्यावर वाघीणीला सोनारळी येथील विशेष एनक्लोजरमध्ये सॉफ्ट रिलीज पद्धतीने सोडण्यात आले आहे. या पद्धतीअंतर्गत वन्य प्राण्याला मुक्त जंगलात सोडण्यापूर्वी काही काळ नियंत्रित वातावरणात ठेवून त्याला नवीन अधिवासाशी जुळवून घेतले जाते. पुढील काही आठवड्यांत तिच्या हालचाली, आहार, वर्तन आणि आरोग्याचा तपशीलवार अभ्यास केला जाणार आहे. सर्व निरीक्षणे पूर्ण झाल्यानंतरच तिला सह्याद्रीच्या मूळ जंगलात खुल्या अधिवासात सोडले जाईल. अशा प्रकारचे वैज्ञानिक पुनर्स्थापन जंगलातील जैवविविधता टिकविण्यासाठी आणि व्याघ्रांचे स्वतंत्र प्रदेश निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरते.

व्याघ्रसंख्या संतुलित करण्याचा प्रयत्न
ऑपरेशन तारा, हे महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासाठी एक दीर्घकालीन आणि समन्वित प्रयत्न आहे. ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांमध्ये गेल्या काही वर्षांत वाघांची संख्या स्थिरपणे वाढत आहे तर सह्याद्रीत वाघांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या विस्तीर्ण जंगलात वाघांसाठी योग्य अधिवास निर्माण करण्याचा आणि व्याघ्रसंख्या संतुलित करण्याचा राज्य वन विभागाचा हा प्रयत्न मानला जात आहे. स्थलांतर प्रक्रियेत ताडोबा, सह्याद्री तसेच हकक यांच्या तज्ज्ञ पथकांनी घेतलेला समन्वय, काटेकोर नियोजन आणि सावधगिरीमुळे ही कारवाई यशस्वी झाल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR