परभणी : सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील ग्रामपंचायत समोर कापूस भरून उभा केलेले पिकअप वाहन चोरून नेल्याची घटना दि.२९ डिसेंबर रोजी रात्री घडली होती. या प्रकरणी स्थागुशाच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवत सेलू शहरातून २ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ९ क्विंटल कापूस व महिंद्रा मॅक्स पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथील भानुदास श्रीरंग पवार यांनी मंिहद्रा पिकअप वाहन क्रमांक एमएच २३- ४००९मध्ये कापूस भरून त्यावर ताडपत्री झाकून ठेवला होता. हे वाहन ग्रामपंचायत समोरील मोकळ्या जागेत लावले होते. हे वाहन दि.२९ डिसेंबर रोजी रात्री चोरून नेल्याची तक्रार श्रीनिवास ज्ञानेश्वर पवार यांनी सेलू पोलिस ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस अधीक्षक रागसुधा आर., अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पो.नि. व्ही. डी. चव्हाण, पोउपनि. गोपिनाथ वाघमारे, पोलिस अंमलदार विलास सातपुते, सिध्देश्वर चाटे, विष्णू चव्हाण, मधुकर ढवळे, नामदेव डुबे, राम पौळ, संजय घुगे, सायबर सेलचे बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांनी गोपनीय माहितीच्या आधारे अशोक सदाशिव पवार (२७) रा. शिंदे टाकळी ह.मु. पारिजात कॉलनी सेलू, अनिल उर्फ विठ्ठल पवार (२४) रा. शिंदे टाकळी या २ आरोपींना सेलू येथून ताब्यात घेतले. या आरोपींकडून ५४ हजार ९०० रूपयांचा ९ क्विंटल कापूस व २ लाख रूपयेकिंमतीचे पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी सेलू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.