नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून खाते काढून घेतले आहे. तसेच सदनिका गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर अटकेच टांगती तलवार कायम असून शुक्रवारी यावर निर्णय होणार असल्याची माहिती आहे. यावर कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला असून राज्यात कायद्याला तुडविण्याचे काम सरकाार करीत असल्याचे म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातील सरकारची भूमिका कायद्याला धरून नाही. कायद्याला पायदळी तुडवण्याची त्यांची भूमिका आहे. न्यायालयाचे अवमान करण्याची भूमिका आहे. संविधानाला न जुमाणणारी भूमिका आहे आणि ही भूमिका म्हणजे आम्ही न्यायालयापेक्षा मोठे आहोत, कोणालाही जुमानत नाही आणि मन वाटेल ते वाटेल ते करू, अशी ती भूमिका असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, जर सुनील केदारे यांची आमदारकी २४ तासांच्या आत रद्द केली जाऊ शकते, राहुल गांधींचे घर खाली केले जाऊ शकते खासदारकी रद्द करून तर जे काही अभय दिले जाते त्यावेळी या सरकारला वाटते की सरकारमधील एक मंत्री गजाआड होताना आमची मान खाली झुकेल. पण महाराष्ट्रातील जनतेच्या पुढे त्यांची मान नक्कीच झुकलेली आहे. यापलीकडे जाऊन मी सांगतो की कोणी कितीही मोठा गुन्हा केला तरी त्याला वाचवण्याचे या सरकारचे प्रयत्न असतील, अशी टीका त्यांनी केली.
तटकरेंना सर्व माहिती
धनंजय मुंडे अमित शहा यांना भेटून आले आणि सुनील तटकरे यांना याबाबत माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, सगळ्यांना सगळे माहीत असते. खालून वरपर्यंत सगळे माहीत आहे. राहिला धनंजय मुंडे यांचा विषय, तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा का द्यावा लागला, इथून नव्याने सुरुवात करावी लागेल. परंतु, आज तरी त्यांचा नंबर लागतो की नाही या संदर्भात कुठेही स्पष्ट भूमिका नाही.

