अयोध्या : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपास अहवालात मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय, विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा आणि बांधकाम प्रभारी गोपाल राव यांच्यासह १७ जणांना आरोपी मानले आहे. त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
तपासादरम्यान एसआयटी टीमला दानपेट्यांच्या चाव्या रामशंकर यादव उर्फ टिन्नू यांच्याकडे मिळाल्या. एसआयटीने सुमारे १५० सेवादार आणि कर्मचा-यांची ओळख पटवली आहे, ज्यांच्या आर्थिक स्थितीत २२ जानेवारी २०२४ रोजी रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर बदल झाला. यामध्ये चंपत राय यांचे जवळचे मानले जाणारे फूलकांत मिश्रा यांचाही समावेश आहे. त्यांच्याकडे ३ लक्झरी गाड्या आहेत, ज्यांची एकूण किंमत २५ लाख रुपये आहे.
एसआयटीने मंगळवारी आपला चौकशी अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. सूत्रांनुसार, यामध्ये एफआयआर दाखल करण्याची आणि ट्रस्टची पुनर्रचना करण्याची शिफारस करण्यात आली आहे. कोणत्याही वरिष्ठ अधिका-याला मंदिराचा सीईओ म्हणून नियुक्त करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. टीमने सांगितले की, हा २० पानांचा प्राथमिक अहवाल आहे. यामध्ये १५० लोकांच्या चौकशीची माहिती आहे. सूत्रांनुसार, एसआयटीने मागील ५ वर्षांच्या देणग्यांचे ऑडिट (लेखापरीक्षण) करण्याची शिफारस देखील केली आहे. देणग्यांमध्ये अनियमितता रोखण्यासाठी सूचना दिल्या आहेत. ट्रस्टच्या पदाधिका-यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सूत्रांनुसार, राज्य सरकारकडून अहवाल पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) मिळाला आहे. ट्रस्टच्या कोणत्या सदस्यांना ठेवावे किंवा काढून टाकावे हे पीएमओ ठरवेल.
















