19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्र...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो

…तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो

छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी एका मुलाखतीत केलेल्या काही दाव्यांमुळे आज राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आले होते. त्यात मी छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केले असते तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असती, असा दावाही शरद पवार यांनी केला होता. त्यानंतर याबाबत प्रतिक्रिया देताना मला मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष फुटला असता, असे ते का म्हणाले हे मला माहीत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मी शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये राहिलो असतो तर तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ दिवसभर सुरू असलेल्या चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मी शिवसेना सोडली नसती तरी मुख्यमंत्री झालो असतो, काँग्रेस सोडली नसती तरी मुख्यमंत्री झालो असतो. १९९९ मध्ये काँग्रेसचे अनेक मोठे नेते मी पक्ष सोडू नये, असा आग्रह करत होते. दोन महिन्यांनंतर होणा-या विधानसभा निवडणुकीसाठी तुम्हालाच मुख्यमंत्री जाहीर करतो, असे सांगत होते. मात्र मी शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष झालो. त्यावेळी पक्षाच्या जिल्हा संघटना तयार झाल्या नव्हत्या. तरीही आम्ही उमेदवार दिले.

तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच वेगवेगळे निवडणूक लढवत होते. तर शिवसेना आणि भाजपा एकत्र निवडणूक लढवत होते. त्या निवडणुकीचा निकाल त्रिशंकू लागला. त्यावेळी असे लक्षात आले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर सरकार स्थापन होईल. त्यानंतर आम्ही ते आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यावेळी काँग्रेसचे आमदार जास्त होते. त्यामुळे विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले. तर मी उपमुख्यमंत्री झालो.

दरम्यान, २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता पण पक्ष नेतृत्वाने ते पद काँग्रेसला दिले, असा आरोप अजित पवार यांनी केला होता. या आरोपाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, २००४ मध्ये मुख्यमंत्रि­पदाबाबत निर्णय फार विचारपूर्वक घेण्यात आला होता. तेव्हा अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविण्याचा प्रश्न नव्हता. कारण ते फारच नवखे होते. मुख्यमंत्रि­पदासाठी कोणी योग्य नेता आमच्याकडे नव्हता. तेव्हा छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिले असते तर भविष्यात पक्षात फूट पडली असती. त्यामुळे अधिकची मंत्रि­पदे आणि खाती मिळवून मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा निर्णयावर आम्ही आलो असे शरद पवार म्हणाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR