14.7 C
Latur
Friday, November 14, 2025
Homeमहाराष्ट्रमनसेकडून आघाडीचा अद्याप प्रस्ताव नाही

मनसेकडून आघाडीचा अद्याप प्रस्ताव नाही

आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्टीकरण

मुंबई : प्रतिनिधी
निवडणूक आयोगाकडे गेलेले शिष्टमंडळ हे मतदार याद्यातील घोटाळे आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेतील दोष यासंदर्भात होते. यात कोणत्या पक्षाला आघाडी वा युतीत सहभागी करून घेण्याचा मुद्दा नव्हता. मनसेकडून आघाडी विषयी कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही. इंडिया आघाडीत एखाद्या पक्षाचा सहभाग करायचा असेल तर त्याचा निर्णय इंडिया आघाडीतील घटक पक्ष घेतील, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी दिले.

१३ ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीची बैठक होती. त्यावेळीच प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी निवडणूक आयोगाकडे जाणा-या शिष्टमंडळात काँग्रेसचे कोणते नेते सहभागी होणार आहेत, हे स्पष्ट केले होते. त्यानुसार जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड शिष्टमंडळात सहभागी झाल्या होत्या. दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे माझी बैठक ठरलेली असल्याने मी दिल्लीला गेलो होतो.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुराव्यासह निवडणुकीतील घोटाळ्याचा पर्दाफाश करत आहेत. यात महाराष्ट्रातील कामठी मतदारसंघ आणि मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील घोटाळेही त्यांनी उघड केले आहेत, असेही सपकाळ म्हणाले.

खासदार संजय राऊत यांच्याशी याआधीही संवाद झालेला आहे आणि यापुढेही संवाद करण्यास आनंदच होईल. त्यासंदर्भात काहीही समस्या नाही. फोन करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही देईन असेही सपकाळ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

दरम्यान, ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिलेली असताना काही संघटनांनी आक्षेप घेत या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले. या संघटना सेन्सॉर बोर्डालाही जुमानत नाहीत. त्यांनी जी गुंडगिरी करून चित्रपटाचे खेळ बंद पाडले ही आपली संस्कृती नाही. चित्रपट निर्मात्यांनी आता या चित्रपटाचे नाव बदलून ‘मन की बात’ करावे असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR