नांदेड : प्रतिनिधी
सध्या मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे तसेच पनवेल, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे रेड अलर्ट आहे. परंतु नांदेड वगळता कुठेही गंभीर परिस्थिती नाही, असा दावा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
मुखेड तालुक्यातील पुरस्थिती आणि झालेल्या हाणीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी ते नांदेड दौ-यावर होते. यावेळी पत्रकारांनी महाजन यांच्याशी संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की, २१ तारखेपर्यंत हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे परिस्थितीवर सर्व यंत्रणा नजर ठेवून आहेत. या पुरपरिस्थितीमुळे जनावरे वाहून गेली असून राज्यात ११ ते १२ जण दगावले आहेत. त्यापैकी ९ जण नांदेड येथील आहेत. मुखेड तालुक्याची गंभीर परिस्थिती आहे, त्यामुळे मुखेड येथे मुद्दामहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला पाठविले आहे.
त्या भागातील सर्व नागरिकांना हलविण्यात आले असून त्यांची निवासी अवस्था व भोजन व्यवस्था आदींची सोय करण्यात प्रशासन मदत करीत आहेत. त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी प्रशासनाच्या अधिका-यांना सूचना दिल्या आहेत. पालकमंत्री सावे या परिस्थितीत नांदेड येथे नाहीत या प्रश्नावर उत्तर देताना महाजन म्हणाले की, पालकमंत्री सावे यांची कॅबिनेट सुरू होती, तेव्हा अचानक असे घडले, त्यामुळे ते आले नाहीत. पण येतील असे त्यांनी सांगितले.
हसणाळ येथे मदत पोहोचली नसल्यामुळे पाच ते सहा जण दगावले असा आरोप नागरिक करीत आहेत. या प्रश्नावर मंत्री महाजन म्हणाले की, मी याची माहिती घेतो. कशामुळे झाले याची सुद्धा माहिती घेण्यात येईल. लेंडी प्रकल्पातील पाणी सोडण्याची सूचना गावक-यांना दिली नाही या प्रश्नावर ते म्हणाले की, लेंडी प्रकल्पाच्या अधिका-यांच्या संपर्कात आम्ही होतो. तरी घटना का घडली? त्यांना मदत का पोहोचली नाही याची माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री सावेंना वेळ मिळेना
मुखेड तालुक्यात झालेला ढगफुटीचा पाऊस आणि लेंडी धरणाच्या पाण्यामुळे सहा गावांत पुर परिस्थिती निर्माण झाली. या गंभीर स्थितीमुळे शेकडो संसार उध्वस्त झाले. ८ ते ९ जणांचे पुरात बळी गेले. या प्रकोपाला आता ३ दिवस होत आहेत. परंतू नांदेडचे पालकत्व असलेले पालकमंत्री अतुल सावे यांनी अजूनही पुरग्रस्त भागाला भेट दिली नाही. कामाच्या व्यस्ततेमुळे ते येऊ शकले नाहीत, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाजन यांनी सांगीतले. परंतू पालकमंत्री न आल्याने नांदेडकरांमधून रोष व्यक्त होत आहे.

