नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांतता चर्चा पुन्हा सुरू व्हावी, याबाबत अलीकडील काळात अनेकांनी मते व्यक्त केली आहेत. यातच भारत आणि पाकिस्तानच्या ११७ मान्यवरांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना एक संयुक्त पत्र लिहिले असून दोन्ही देशांत पुन्हा चर्चा सुरू व्हावी, अशी मागणी केली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील ११७ व्यक्तींपैकी ६१ भारतीय आणि ५६ पाकिस्तानी नागरिकांनी स्वाक्षरी केली आहे. सेंटर फॉर पीस अँड प्रोग्रेसचे अध्यक्ष ओ. पी. शाह यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला आहे. पत्रात म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये जगाच्या लोकसंख्येच्या अंदाजे एक-पंचमांश लोक राहतात. दोन्ही देशांमध्ये तरुणांची मोठी लोकसंख्या आहे, परंतु सततच्या तणावामुळे त्यांचे चांगले भविष्य, रोजगार आणि विकासाच्या संधींमध्ये अडथळा येत आहे.
दरम्यान, नवी दिल्ली आणि इस्लामाबाद येथे उच्चायुक्तांची नियुक्ती करून राजनैतिक संबंध पुनर्स्थापित करण्याचे, नागरिकांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याचे, सीमापार धार्मिक आणि सांस्कृतिक प्रवासाला सुविधा देण्याचे, तसेच काश्मिरी पंडितांसाठी पवित्र असलेले शारदा पीठ हे तीर्थक्षेत्र यात्रेकरूंसाठी पुन्हा उघडण्याचे आवाहन केले. तसेच दोन्ही देशांमधील प्रसारमाध्यमांवरील निर्बंध उठवण्याची आणि पत्रकारांना मुक्तपणे वार्तांकन करण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. पत्राच्या शेवटी असे म्हटले आहे की, हे आवाहन कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन नसून, सुमारे दोन अब्ज लोकांचे भविष्य, शांतता आणि प्रादेशिक स्थैर्य यांच्या हितासाठी आहे.
कोणत्या मान्यवरांच्या सह्या केल्यात?
भारतातील माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, मीरवाईज उमर फारूक, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर, राज्यसभा खासदार मनोज झा, ‘रॉ’चे माजी प्रमुख ए. एस. दुलात यांच्यासह अनेक शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर स्वाक्षरी केली आहे. पाकिस्तानी माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी, माजी राजनयिक अश्रफ जहांगीर काझी, शास्त्रज्ञ परवेझ हुडभॉय आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या आवाहनावर स्वाक्षरी केली आहे.
















