23.1 C
Latur
Tuesday, July 8, 2025
Homeमहाराष्ट्रशरद पवार-बच्चू कडू यांच्यात झाली भेट

शरद पवार-बच्चू कडू यांच्यात झाली भेट

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आमदार बच्चू कडू यांच्यात आज अमरावती येथे भेट झाली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळ-जवळ १५ ते २० मिनिटे चर्चा झाली. शरद पवार हे सध्या दोन दिवसांच्या अमरावती दौ-यावर आहेत. या दौ-यावर असताना बच्चू कडू यांनी शरद पवारांना घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यावर आज गुरुवारी शरद पवार यांनी वझ्झर येथील शंकर बाबा पापडकर यांच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर बच्चू कडूच्या निवासस्थानी पूर्णा येथे जाऊन त्यांची भेट घेतली.

मात्र या भेटीचे आमंत्रण दिल्यापासून चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर आता बंद दाराआड झालेल्या या भेटीमुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात असून चर्चेला जोर मिळाला आहे.

आज घडीला कुठल्याही राजकीय नेत्याची भूमिका सहजासहजी लक्षात येत नाही. त्यातच आता प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेमुळे आगामी काळात बच्चू कडू काय भूमिका घेतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र, एकीकडे या चर्चा रंगत असताना या चर्चांना स्वत: बच्चू कडू यांनी पूर्णविराम दिला आहे. यावेळी बच्चू कडू म्हणाले की, शरद पवार यांच्यासोबत थोडी राजकीय आणि सामाजिक चर्चा झाली. मात्र या भेटी दरम्यान सर्वाधिक चर्चा ही शेतीवर झाली. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे ही रोजगार हमी योजनेत व्हायला हवेत. ही बाब तुमच्या अजेंड्यामध्ये असायला हवीत, असे मी त्यांना सुचवले, असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

या भेटी दरम्यान काही राजकीय चर्चा झाल्याचे विचारले असता बच्चू कडू म्हणाले की, आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही, मात्र समजा जर ती, झाली असेल तरी तुम्हाला सांगायचं काही कारण नाही. ब-याच गोष्टी उघड करायच्या नसतात. शिंदे साहेब जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. अजून आकाशात ढगच आले नाहीत, ढग येऊद्या मग पाहू, अशा मिश्किल शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया देत या भेटीतील गुप्तता पाळली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR