जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभेनंतर सत्ता बदललेली अलेल असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी मराठा आंदोलकांनी संवाद साधला त्यावेळी विधानसभेनंतर मी काय बोललो हे जरांगे पाटलांना कळेल असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना विधानसभेत सत्ताच पलटणार मग काय बोलणार असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीच्या तयारीला लागलो आहे. १४ ते २० ऑगस्टपर्यंत डाटा घेणार आहे. त्यानंतर चर्चा करून २९ ऑगस्टला घोषणा करणार आहे. त्याचबरोबर जिथे जिथे मराठ्यांना त्रास झाला तिथे १०० टक्के हिशोब होणार आहे. रोज आजी माजी आमदार भेटायला येत आहेत. सगळ्यांना सोबत घेवून एका मार्गाने चालणार असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समजाला आरक्षण मिळावे म्हणून मोठं आंदोलन उभारले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजासाठी सरकारने स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीवर अद्यापही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत, मात्र दुसरीकडे ओबीसी समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला मोठा विरोध होत आहे.